प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात गडचिरोली व गोंदियाचे सी–60 पथक ठरले अव्वल

राज्यभरातील सर्व पथकांना टाकले मागे

गडचिरोली : देशात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी सुरक्षा दलांच्या जवानांच्या पथसंचलनाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात पोलिस दलातील विविध घटकांतील पथके आपल्या शिस्तीचे, एकजुटीचे प्रदर्शन पथसंचलनाच्या माध्यमातून दाखवितात. यावर्षीच्या 26 जानेवारीच्या पथसंचलनात गडचिरोली आणि गोंदियाच्या सी-60 पथकांनी उत्कृष्ट पथसंचलन करत राज्यभरातील पथकांमध्ये सरस ठरण्याचा बहुमान पटकावला.

उत्कृष्ट पथसंचलन केलेल्या पथकांना शासनातर्फे दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्याकरिता गठित करण्यात आलेल्या निवड समितीने उत्कृष्ट पथसंचलनासाठी अनुक्रमे प्रथम क्रमांक गडचिरोली आणि गोंदिया सी-60 पथक, द्वितीय क्रमांक राज्य राखीव पोलिस बल आणि तृतीय क्रमांक बृहन्मुंबई पोलिस दंगल नियंत्रण पथक अशा तीन पथकांची निवड केली आहे.

गडचिरोली पोलिस दल व गोंदिया पोलिस दलाच्या सी–60 पथकाने संयुक्तरित्या सर्वोत्कृष्ट पथसंचलन करुन 26 जानेवारी 2024 रोजी शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे महामहिम राज्यपाल यांच्या उपस्थितीत सादरीकरण केले. सर्वोत्कृष्ट पथसंचलन करणा­ऱ्या पथकांना सोमवार, दि.29 रोजी अपर पोलिस महासंचालक (प्रशासन) यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

गडचिरोली पोलिस दलाची सी – 60 पथके नक्षलविरोधी कारवायांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत असतात. त्यासोबतच पथसंचलनामध्ये देखील त्यांनी आपल्या शिस्तीचे आणि एकजुटीचे प्रदर्शन दाखविले आहे. त्याबद्दल पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पथक प्रमुख पो.निरीक्षक कुंदन गावडे, उपनिरिक्षक कृष्णा साळुंखे व जवानांचे कौतुक करत भविष्यात अशीच कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.