अहेरी : देशभरात सध्या निवडणुकीसोबत आयपीएल क्रिकेट सामन्यांचाही सिजन सुरू आहे. त्याचा फायदा घेत अहेरीतील बालाजी गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन सट्ट्याचा अहेरी पोलिसांनी सोमवारी पर्दाफाश खेला. यात १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील चार जणंना अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आयपीएलचा सिजन सुरू झाल्यानंतर अवैधपणे सट्टाबाजी होणार नाही यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार अहेरी पोलिस सतर्क झाले होते. अशात अहेरीत क्रिकेटवर सट्टा लावल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक अहेरी एम.रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी (अहेरी) अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात अहेरीचे पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे, उपनिरीक्षक जनार्धन काळे, गवळी व पोलिस पथकाने विशेष मोहिम राबवली. त्यात अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथे छापा मारला असता, बनावटी अॅप nice.7777.fun या प्लॅटफार्मवर ऑनलाईन आयपीएल क्रिकेटवर सट्टयाचा खेळ खेळून इतर लोकांना त्यावर पैसे लावण्यास उचकावले जात असल्याचे दिसून आले.
या छापेमारीत घटनास्थळावरून निखिल दुर्गे व आसिफ शेख यांच्या ताब्यातून चार मोबाईल फोन आणि रोख 9,420 रुपये, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासात इरफान ईकबाल शेख रा.अहेरी याचे संदीप गुडपवार रा.आल्लापल्ली हा सदर रॅकेट चालवत असल्याचे स्पष्ट झाले. सदर सट्टयाचा जुगार चालविणारे निखिल दुर्गे व आसिफ शेख हे एजंट वर्गात मोडतात. तसेच त्यांच्या (बेस लेवल) खालच्या पातळीवर काम कारणारे निखिल गुंडावार, प्रणित श्रीरामवार, अक्षय गनमुकलवार, फरमान शेख, फरदिन पठाण हे सुध्दा आयपीएल सट्टयामध्ये एजंटचे काम करत असल्याचे समोर आले.
या गुन्हयातील सर्व १० आरोपींविरुध्द पोलिस स्टेशन अहेरी येथे महाराष्ट्र जुगारबंदी कायद्याचे कलम 4 व 5 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या नेतृत्वात, पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे, उपनि जनार्धन काळे, पोउपनि गवळी व त्यांच्या पथकाने पार पाडली.
जिल्हयातील नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध सट्टेबाजीपासून दुर राहावे, जर कोणी असे अवैध व्यवसाय चालवित असतील त्यांची माहिती पोलिस विभागाला देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.