गडचिरोली : येथील एमआयडीसीच्या मैदानावर महिनाभरापूर्वी लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लि.च्या वतीने सुरू झालेल्या गडचिरोली जिल्हा प्रीमियर लीग (जीडीपीएल) क्रिकेट सामन्यांचा अंतिम महामुकाबला बुधवारी (दि.19) संध्याकाळी झाला. या सामन्यात गडचिरोली कमांडो पोलिसांच्या चमूवर मात करत गडचिरोली हरिकेन्स संघाने जीडीपीएल चषक पटकावला. जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, माजी मंत्री आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते आणि माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॅा.देवराव होळी, माजी आ.डॅा.नामदेव उसेंडी, माजी आ.दीपक आत्राम, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा तथा लॅायड्सच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विजेत्या चमुला चषक बहाल करण्यात आला.

हा सामना पाहण्यासाठी जिल्हाभरातील क्रिकेटप्रेमी गडचिरोलीत आले होते. त्यामुळे एमआयडीसी मैदानावर उभारलेल्या अस्थायी गॅलरी पूर्णपणे भरून गेल्या होत्या. सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत अंतिम सामना सुरू होता. त्यानंतर विजेत्या-उपविजेत्या संघांसह वैयक्तिक बक्षिसांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उडत्या गितांवर थिरकले गडचिरोलीकर
सर्वांचे आकर्षण ठरलेल्या प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या संगीत रजनीचा रसिक श्रोत्यांनी मनमुराद आनंद लुटला. सोनूच्या अनेक उडत्या चालीवरील गितांवर युवा रसिक थिरकत होते. दोन तासांपेक्षा अधिक वेळ सोनूने गडचिरोलीकरांना रिझविले. अनेक निमंत्रितांना आपल्या परिवारासह या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा होता. परंतू पासेस मर्यादित असल्याने बऱ्याच जणांची फजिती झाली. याचा फटका पत्रकारांच्या कुटुंबियांनाही बसला. या कार्यक्रमाचे यु-ट्युबवर लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू असल्याने अनेकांनी घरूनच कार्यक्रमाचा आनंद घेणे पसंत केले.