आरोग्य सुविधा, वीज पुरवठ्यासह पेसा क्षेत्रात रेतीची समस्या दूर करा

ग्रामसभेने निवेदनातून वेधले लक्ष

भामरागड : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यात आजही अनेक मूलभूत सोयी-सुविधांच्या समस्या कायम आहेत. त्या समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी ग्रामसभेच्या वतीने मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॅा.प्रणय खुणे यांना निवेदन देऊन करण्यात आली.

या निवेदनात प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर संपूर्ण रुग्णालय चालत असल्याने या ठिकाणी एक पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, मागील दोन वर्षापासून येथील महावितरण कंपनीचे काम बिघडले आहे. भामरागड येथे सबस्टेशन देण्यात आले पण ते एका अभियंत्यावर चालत आहे. सदर अभियंत्याचेही अनेक वेळा कामाकडे दुर्लक्ष होते. तालुक्यातील संपूर्ण गावे पेसामध्ये आहेत. या ठिकाणी येचली किअर, करमपल्ली, बांडेनगर व नगरपंचायत भामरागडमध्ये हेमलकसा नदी जोडून आहे. त्या ठिकाणी राज्य सरकारचा शासकीय रेतीघाट तयार होऊ शकतो. त्यामुळे पेसा कायद्यांतर्गत लवकरात लवकर येथे रेतीघाट तयार करण्यात यावा, रेतीघाट नसल्यामुळे या ठिकाणातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा उपसा चालत असतो.

राज्य शासनाने या सर्व समस्यांकडे लक्ष देऊन त्या दूर कराव्यात, अशी मागणी भाजपचे तालुका अध्यक्ष अर्जुन आलाम, जिजगावचे समाजसेवक सीताराम मडावी, येचलीचे उपसरपंच संजय येजुलवार, पल्लीचे सरपंच मनोज पोरटेत, तसेच मानवाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष भीमराव वनकर यांनी केली. यावेळी भामरागड तालुक्यातील ग्रामसभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.