गडचिरोली : गेल्या साडेतीन वर्षांपासून गडचिरोली पोलिस दलात सेवा देत असलेल्या नव्या दमाच्या १०५ पोलिस अधिकाऱ्यांची त्यांच्या ऐच्छिक ठिकाणी बदली झाली आहे. त्यामुळे त्यांना पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी मार्गदर्शन करून त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
नक्षलविरोधी अभियानात आणि या जिल्ह्यात अडीच वर्ष आव्हानात्मक ड्युटी केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांना पसंतीच्या ठिकाणी बदलीही मिळते. पण उपनिरीक्षकांच्या या तुकडीची बदली तांत्रिक कारणामुळे एक वर्ष रखडली होती. राज्याच्या विविध भागातील रहिवासी असलेल्या या १०१ उपनिरीक्षक, ३ सहायक निरीक्षक आणि एका निरीक्षकाला आता त्यांच्या पसंतीच्या परिक्षेत्रात बदली मिळाली आहे.
गडचिरोलीतील कमांडो ट्रेनिंग सेंटरचे आधुनिकीकरण
राज्यातील नक्षलविरोधी अभियानात सहभागी होणाऱ्या पोलीस जवानांना गडचिरोली जिल्ह्यातील किटाळी येथे असलेल्या कमांडो ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण दिले जाते. नक्षलवाद्यांशी लढताना अत्याधुनिक शस्र चालविण्यासह अनेक गोष्टींचे प्रशिक्षण सी-६० (सिक्स्टी) म्हणून निवडलेल्या पोलिसांना दिले जाते. या ट्रेनिंग सेंटरमध्ये निर्माण करण्यात आलेल्या विविध आधुनिक सुविधांचे उद्घाटन शुक्रवारी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी जवानांच्या शौर्याचे प्रतीक दर्शविणाऱ्या कमांडोच्या पुतळ्याचे अनावरण, फायरिंग रेंज, फायर बटचे नुतनीकरण तसेच लेक्चर हॉलचे नुतनीकरण करण्यात आले आहे.