तेंदुपत्ता वाहतूक परवान्याच्या एनओसीसाठी घेतली तब्बल १ लाख ३० हजारांची लाच

दोघांना अटक, बिडीओचा शोध सुरू

गडचिरोली : जिल्ह्यातल्या अहेरी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी प्रतीक दिवाकर चन्नावार याने तेंदुपत्त्याच्या वाहतूक परवान्यासाठी कंत्राटदाराला तब्बल १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच प्रत्यक्ष स्वीकारताना पंचायत समितीमधील तालुका पेसा समन्वयक संजीव येल्ला कोठारी आणि खासगी व्यक्ती अनिल बुधाजी गोवर्धन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मात्र लाचेची मागणी करणारा प्रभारी बिडीओ पळून गेला. त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराने गोविंदगाव येथील तेंदुपत्ता लिलावात घेऊन त्याच्या वाहतूक परवान्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. पण ते देण्यासाठी प्रभारी बिडीओ चन्नावार आणि कंत्राटी तालुका पेसा समन्वयक संजीव कोठारी यांनी मिळून १ लाख ३० हजार रुपयांची मागणी केली.

याप्रकरणी तक्रार मिळताच एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल लोखंडे यांच्या पर्यवेक्षणात पो.निरीक्षक श्रीधर भोसले यांनी शहानिशा केली. त्यानंतर दोन्ही आरोपींना पैसे घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईची कुणकुण लागताच प्रभारी बिडीओ चन्नावार पळून गेला. त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान अटक केलेल्या दोन्ही लाचखोरांना अहेरीच्या न्यायालयाने दोन दिवसांचा पीसीआर दिल्याने त्यांना शनिवारी संध्याकाळी गडचिरोलीत आणण्यात आले.

ही कारवाई पो.निरीक्षक श्रीधर भोसले, पो.नि. शिवाजी राठोड, हवालदार नथ्थू धोटे, नायक राजेश पदमगिरवार, किशोर जौंजारकर, शिपाई संदीप उडान, संदीप घोरमोडे, चालक प्रफुल्ल डोर्लीकर आदींनी केली.