रोजगार निर्मितीत गडचिरोली विदर्भात अव्वल, दिड लाख लोकांना लाभ

गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी पुढे

गडचिरोली : जिल्ह्यात रोजगाराची साधने कमी असल्याची ओरड नेहमी होत असली तरी शासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या हातांना मोठ्या प्रमाणात काम दिले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या 9 महिन्यात आतापर्यंत 80 हजार 651 कुटुंबातील 1 लाख 51 हजार 811 मजुरांनी रोजगार हमीच्या कामांचा लाभ घेतला. या बाबतीत गडचिरोली विदर्भात सर्वाधिक पुढे, तर राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे.

हाताला काम नसल्याने कोणाची उपासमार होऊ नये, कोणाला इतर जिल्ह्यात किंवा राज्यात स्थलांतर करावे लागू नये म्हणून शासनाकडून रोजगार हमी योजना राबविली जाते. यात विविध विभागांमार्फत कौशल्यपूर्ण कामांसोबत साधी कामे प्रस्तावित केली जातात. लोकांच्या मागणीनुसार ती कामे सुरू केली जातात.

2024-25 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यात 96 हजार 390 जॅाबकार्डधारक कुटुंबांमधील 1 लाख 97 हजार 688 लोकांसाठी कामांची तरतूद केलेली आहे. त्यात आतापर्यंत 80 हजार 651 जॅाबकार्डधारक कुटुंबांमधील 1 लाख 51 हजार 811 जणांनी प्रत्यक्ष कामावर जाऊन रोजगार हमी योजनेचा लाभ घेतला. अजूनही 46 हजार लोकांच्या हाताला काम मिळेल एवढी कामे शिल्लक आहेत.

रोहयोचा सर्वाधिक लाभ घेणाऱ्या तालुक्यांमध्ये चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक 22541, गडचिरोली तालुक्यात 22441 आणि आरमोरी तालुक्यात 21688 मजुरांनी कामांचा लाभ घेतला आहे.

रोहयोचा सर्वात कमी लाभ घेणाऱ्या तालुक्यांमध्ये एटापल्ली (3044), सिरोंचा (3353) आणि भामरागड (4028) या तालुक्यांचा समावेश आहे.