आलापल्ली : परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत झालेला मृत्यू, बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून शुक्रवारी (दि.27) येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
आलापल्ली येथील संघमित्रा बौद्ध विहार येथून निघालेला हा मोर्चा मुख्य चौकातून वीर सावरकर चौक मार्गे वीर बाबुराव चौक येथे पोहोचला. त्या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. अहेरीचे नायब तहसीलदार नरेंद्र दाते यांच्याकडे राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या नावे मागण्यांचे निवेदन सोपविण्यात आले. न्याय तात्काळ न मिळाल्यास अजून मोठ्या स्वरूपात जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या मोर्चात ‘हमारी मांगे पुरी करो, वर्ना खुर्ची खाली करो’, परभणी येथील शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी व बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, अमित शहा यांनी जनतेची जाहीर माफी मागावी आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी नारेबाजी करण्यात आली.
मोर्चात संघमित्रा बौद्ध विहाराचे पदाधिकारी, नागसेन बौद्ध विहाराचे पदाधिकारी, ज्ञान प्रसारक मंडळ अहेरीचे पदाधिकारी, बोधीसत्व सामाजिक विकास मंडळ अहेरीचे पदाधिकारी, पेरमिली येथील बौद्ध समाज मंडळाचे पदाधिकारी तसेच आलापल्ली, अहेरी, नागेपल्ली, चेरपल्ली येथील समाज बांधव व विविध पक्षातील आणि शिव, फुले, शाहू, बिरसा मुंडा, आंबेडकरप्रेमी नागरिक तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.