गडचिरोली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करून देशआला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचे विचार व कार्य अजरामर असून प्रत्येक धर्माच्या लोकांनी शांती व अहिंसेचा मार्ग अंगिकारावा, तेव्हाच देश सुजलाम सुफलाम होईल, असे प्रतिपादन भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांनी केले.
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विचार मंचद्वारे गांधीजींचे विचार, कार्य व दर्शन लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत शांतिदूत प्रकाश अर्जुनवार यांच्या नेतृत्वात सर्वधर्म समभाव प्रार्थना आणि वैश्विक गांधी शांती यात्रेचे आयोजन केले आहे. गडचिरोलीत त्या यात्रेच्या शुभारंभप्रसंगी खा.नेते बोलत होते. यावेळी खा.नेते यांनी यात्रेत सहभागी होऊन काही अंतर पायी चालत गेले.
जैन धर्म, गांधी धर्म व संविधानाला जवळून समजून घेण्याकरिता ही यात्रा काढण्यात आल्याचे प्रकाश अर्जुनवार यांनी सांगितले. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सचिव पंडित पुडके, ग्रामसेवा अधिकारी सुरेश मांडवगडे, मधुकर भोयर, गोवर्धन चव्हान, सत्यविजय देवतळे तसेच अनेक गणमान्य उपस्थित होते.
गडचिरोलीतील इंदिरा गांधी महाविद्यालयातून प्रारंभ झालेली ही शांतीयात्रा पोटेगाव रोड, रेड्डी गोडाऊन, रामनगरपर्यंत फिरली. यावेळी विविध घोषवाक्यातून वातावरण निर्मिती करण्यात आली. यात्रेत प्रा.राजन बोरकर, प्रा.दीपक ठाकरे, प्रा.विशाल भांडेकर, प्रा.मनिषा एलमुलवार, प्रा.हर्षल गेडाम, प्रा.हर्षाली मड़ावी सहभागी झाले होते.