राष्ट्रवादी (शरद पवार) दोन महिन्यात निवडणार जिल्ह्यात नवीन पदाधिकारी

जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांची माहिती

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)च्या विविध सेलसह नवीन पदाधिकाऱ्यांच्या सर्व कार्यकारिणींची निवड येत्या दोन महिन्यात केली जाईल. आगामी सर्व निवडणुकाही आम्ही लढविणार, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी शनिवारी गडचिरोलीत पत्रकारांशी बोलताना दिली.

पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या दौऱ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस सुरेश सावकार पोरेड्डीवार, चिटणीस संजय ठाकरे, शहराध्यक्ष विजय गोरडवार, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शेमदेव चापले, अमोल गण्यारपवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राजापूरकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आणि देवेंद्र फडणविस दिशाभूल करत असल्याचा आरोप करत ओबीसी जनगणनेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सांगितले. गण्यारपवार यांनी जिल्ह्यात शरद पवार यांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या ५ हजार कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र घेतले जात असल्याची माहिती यावेळी दिली.