सलोखा आणि सद्भाव टिकवून गणेशोत्सव शांततेत पार पाडा

माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचे आवाहन

गडचिरोली : गणेश उत्सवात समाजातील सलोखा,सद्भाव टिकून राहण्यासाठी आणि अनुचित घटना घडू नये म्हणून गणेश मंडळांनी गणेशोत्सव शांततेत साजरा करावा, असे प्रतिपादन भाजप महिला आघाडीच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी केले.

गडचिरोली पोलीस दल, पोलीस स्टेशन गडचिरोली यांच्याकडून गणेश मंडळ व शांतता समितीची बैठक स्थानिक आरमोरी मार्गावरील संस्कृती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी पोलिस अधीक्षक निलोत्पल, तसेच उपस्थित मान्यवरांनीसुध्दा मार्गदर्शन केले.

अप्पर पोलिस अधीक्षक अनुज तारे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर, पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, तहसीलदार महेंद्र गणवीर, नप मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष वासुदेव शेडमाके, अॅड.राम मेश्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचो जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, लतीफ पठाण, शांतता समिती सदस्य, पोलिस पाटील व गणेश मंडळांचे सदस्य उपस्थित होते. बैठकीचे संचालन पोलीस उपनिरीक्षक मिसाळ यांनी तर आभार पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी मानले.