यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी एसआरपी, सी-६० कमांडोंचीही तैनाती

कॅमेरांचीही नजर, काय आहे कारण? वाचा

गडचिरोली : जिल्ह्यात अनंत चतुर्दशीपासून, म्हणजे गुरूवारपासून तीन दिवस सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. जलाशयांच्या ठिकाणी कोणताही अपघात होऊ नये यासाठी जिल्हा व स्थानिक प्रशासनाने खबरदारीचे सर्व उपाय केले आहेत. परंतू गणेश विसर्जन मिरवणुकांसोबत ईद-ए-मिलादच्या मिरवणुकाही निघणार असल्यामुळे सुरक्षा यंत्रणांवरील ताण वाढला आहे.

विशेष म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यात १७० सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांसोबत ईद-ए-मिलादच्या १३ मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे मिरवणुका, विसर्जन तलावांवरील बंदोबस्त आदींसाठी ६०० होमगार्डची ड्युटी लावण्यात आली आहे. एवढेच नाही तर राज्य राखीव पोलिस दल आणि सी-६० कमांडोंचीही बंदोबस्तासाठी मदत घेतली जाणार आहे.

गडचिरोली शहरातील गोकुळनगर तलावावर नगर परिषदेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह फ्लड लाईटची व्यवस्था केली आहे. याशिवाय कोणी खोल पाण्यात जाऊ नये म्हणून सुरक्षा कठडेही लावण्यात आले आहेत.