बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार

आ.बच्चू कडू यांचा अधिकाऱ्यांना इशारा

गडचिरोली : विविध शासकीय योजना किंवा नोकरी लाटण्यासाठी दिव्यांग असल्याचे खोटे प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांची संख्या बरीच आहे. असे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा आमदार तथा दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व मार्गदर्शक बच्चू कडू यांनी दिला. गडचिरोलीत दिव्यांगांच्या दारी या उपक्रमासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. दिव्यांगांसाठी रेल्वे स्थानकांप्रमाणे बस स्थानकांवरही वेगळ्या स्वच्छतागृहाची व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेऊन शासकीय योजनांचा लाभ त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी राज्यात ‘दिव्यांगांच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बुधवारी गडचिरोली जिल्हा प्रशासन दिव्यांगांपर्यंत आले आहे, ही परिवर्तनाची लाट आहे. राज्याच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दिव्यांग बांधवांचे उत्तम पुनर्वसन केले तर हा जिल्हा देशात आदर्श ठरू शकतो व त्याचे अनुकरण इतर जिल्हे करू शकतील, अशी अपेक्षा यावेळी बच्चू कडू यांनी जाहीर भाषणातून व्यक्त केली.

जिल्हा प्रशासन व दिव्यांग कल्याण विभागामार्फत संस्कृती लॉन येथे आयोजित या अभियानात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार डॉ.देवराव होळी, कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, शेखर शेलार, फरेंद्र कुत्तीरकर आदी उपस्थित होते.

दिव्यांग मंत्रालय स्थापन होणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. दिव्यांगांसाठी विविध फंडामधून 5 टक्के निधी केवळ आपल्याच राज्यात खर्च केला जातो. भविष्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र घरकूल योजना आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. दिव्यांग बांधवांची सेवा हे आपले कर्तव्य आहे, असे समजून सर्वांनी काम करावे, असे आवाहनही कडू यांनी केले. यावेळी बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांजवळ जावून त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.

दिव्यांग होऊ नये, यासाठी योग्य उपाययोजना करा : आमदार गजबे

सुरवातीपासूनच दिव्यांग बांधवांसाठी आवाज उठविणाऱ्या बच्चू कडू यांच्यामुळेच दिव्यांग मंत्रालय स्थापन झाले आहे. जिल्ह्यातील दिव्यांगांची परिस्थिती पाहण्यासाठी ते आज गडचिरोलीमध्ये आले. शासन आणि प्रशासन दिव्यांगांच्या योग्य पुनर्वसनासाठी प्रयत्नशील असून महसूल आणि जिल्हा परिषदेप्रमाणेच पोलिस विभागही दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दिव्यांगांपर्यंत मदत पोहचवित आहे. मात्र दिव्यांग बाळ जन्माला येऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी नियमित आरोग्य तपासणी आणि प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. स्पर्धेच्या युगात उंच भरारी घेण्यासाठी दिव्यांग बांधव आणि विद्यार्थ्यांनी स्वत:चा आत्मविश्वास वाढवावा, अशी अपेक्षा आमदार कृष्णा गजबे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी संजय मिना यांनी केले. संचालन प्रा.यादव गहाणे यांनी तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी मानले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी तसेच दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.