Home दैनंदिन बातम्या वैनगंगेकाठच्या नागरिकांनो, सावधान ! चिचडोह बॅरेजचे 38 दरवाजे बंद करणार

वैनगंगेकाठच्या नागरिकांनो, सावधान ! चिचडोह बॅरेजचे 38 दरवाजे बंद करणार

नद्यांची पाणीपातळी वाढणार, दक्षता घ्या

गडचिरोली : जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुक्यात असलेल्या चिचडोह बॅरेजचे दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाद्वारे करण्यात आले आहे. त्याकरीता येत्या 18 नोव्हेंबरपासून सर्व दरवाजे द्वारसंचलन कार्यक्रमानुसार (प्रथम नदी काठावरील व क्रमाने नदीच्या मध्यभागातील) क्रमाक्रमाने बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नदी पात्रात उर्ध्व बाजुस व नदीत आलेल्या उपनद्या व नाल्यांची पाणीपातळी वाढणार. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५ कि.मी. अंतरावर चिचडोह धरणचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झाले आहे. सदर धरण मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरच्या बाजुस 4 किलोमिटर अंतरावर आहे. धरणाची एकूण लांबी 691 मीटर असून 15 मीटर लांबीचे व 9 मीटर उंचीचे 38 लोखंडी उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत. या धरणात 14 नोव्हेंबर 2024 रोजी पाणी पातळी 175.20 मीटर आहे.

वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून, सर्व लगतच्या गावांनी ग्रामपंचायतींनी आपल्या गावकऱ्‍यांना याबाबत दवंडीद्वारे सुचित करण्याचे व नदीकाठावरिल शेतांमध्ये कामे करताना सतर्क राहण्याचे, मासेमारी करणारे व पशुपालक यांनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून नदी ओलांडू नये, रेती घाटातून रेती काढणारे आणि नदीपात्रात इतर काम करणाऱ्या लोकांनी खबरदारी घेण्याच्या तसेच नदी काठावर जाणे टाळण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनामार्फत तसेच गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल मोरघडे यांनी केल्या आहेत.

या गावांना होऊ शकतो धोका

गडचिरोली जिल्ह्यातील कुरूड, रामपूर, विसापूर, निमगांव, खोर्दा, हिवरगांव, तळोधी मोकासा, कुनघाडा, नवेगांव (रै.), आमगांव माल, दर्शनी माल, येवली, मार्कंडा, घारगांव, फराडा, डोटकुली, डोंगरगांव (बु.), शिवणी, मुडझा (बु.), पुलखल. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील हरांबा, कढोली, उमरी, काजळवाही, डोनाळा माल, डोनाळा चक, वढोली गांडली, वढोली चक, पेडगांव, सोनापूर, सामदा, वाघोली बुटी, व्याहाड (बु.), लोंढोली, उसेगांव, कापसी, उपरी.