व्याघ्रबळी ठरलेल्या कुटुंबियांना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मदतीचा हात

पुरस्काराबद्दल आ.कृष्णा गजबे यांचाही सत्कार

गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात वाघांच्या हल्ल्याला बळी पडलेल्या सहा शेतकरी कुटुंबातील वारसदारांना गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मंगळवारी आर्थिक मदत देण्यात आली. ज्येष्ठ भाजप नेते आमदार डॅा.रामदास आंबटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्यासह सत्कारमूर्ती आमदार कृष्णा गजबे प्रामुख्याने उपस्थित होते.

दत्त जयंतीचे औचित्य साधून जिल्हा बँकेच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात मृत व्याघ्रबळी ठरलेल्या कुटुंबातील वारसदाला प्रत्येकी ७५ हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले. त्या मृत व्यक्तींमध्ये वडसा वनपरिक्षेत्रातील महानंदा दिनेश मोहुर्ले, आरमोरी परिक्षेत्रातील ताराबाई एकनाथ धोडरे, देलनवाडी परिक्षेत्रातील सायत्राबाई अंताराम बोगा, गडचिरोली परिक्षेत्रातील इंदिराबाई रमाजी खेडकर, चातगाव परिक्षेत्रातील गंगाराम कवडू फेबलवार आणि कुनघाडा परिक्षेत्रातील मायाबाई धर्माजी सातपुते यांचा समावेश आहे. त्यांच्या वारसदारांनी हे धनादेश स्वीकारले.

यानंतर महाराष्ट्र सरपंच परिषदेकडून यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांचा सत्कार करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.

या कार्यक्रमाला बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, डॅा.हेमंत अप्पलवार, गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत साळवे, आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ईश्वर पासेवार, भाजपचे अनिल पोहणकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॅा.नरेंद्र आरेकर यांनी, तर आभार प्रदर्शन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले. या कार्यक्रमासाठी बँकेचे सरव्यवस्थापक (प्रशासन) तानाजी भुरसे, सरव्यवस्थापक (वसुली) जी.के.नरड, सरव्यवस्थापक (बँकिंग) पी.अल्लमकोटलावार यांच्यासह बँकेच्या मुख्य कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.