रानटी हत्ती पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात, आरमोरी तालुक्यात केले नुकसान

शेतात पीक नसल्याने घरांवर मोर्चा


आरमोरी : काही दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात गेलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने पुन्हा आपला मोर्चा गडचिरोली जिल्ह्याकडे वळविला आहे. बहुतांश शेतात आता धानाचे पीक नसल्यामुळे हे हत्ती रात्रीच्या वेळी जंगलालगतच्या गावात शिरत आहेत. आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा या गावात या हत्तींनी पाच घरांचे नुकसान केले.

हत्तींची चाहुल लागताच कुटुंबातील सदस्यांनी बाहेर पळ काढल्यामुळे जीवित हाणी झाली नाही. घरात ठेवलेल्या मोहफुलांच्या साठ्यामुळे आणि अंगणातील केळीच्या झाडांमुळे हे हत्ती गावाकडे येतात असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान हत्तींच्या कळपाने गावात येऊन नुकसान करणे सुरू केल्यामुळे वनविभागाचे टेन्शन आणखी वाढले आहे. त्यामुळे हत्तींच्या हालचालीवर आता डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार आहे