देसाईगंज : तालुक्यातील कोंढाळा युवा आदिवासी सेवा समितीच्या वतीने राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीचे औचित्य साधून 12 मार्चला गोंडी संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी माजी आ.कृ्ष्णा गजबे यांच्या हस्ते वीर शेडमाके यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
सुरूवातीला प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गावातून मुख्य रस्ताने वाजतगाजत, आदिवासी नृत्य सादर करीत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मा.आ.गजबे यांच्या हस्ते रिबीन कापून मोठ्या उत्साहात पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
यावेळी मुठ पूजा व गोंडी सप्तरंगी झेंड्याचे ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी आपल्या मार्गदर्शनात मा.आ.गजबे म्हणाले, आदिवासी समाज हा निसर्गपूजक, शुध्द पर्यावरणप्रेमी समाज आहे. जगात अनेक स्थित्यंतरे घडत असतानाही आदिवासी समाज आपल्या संस्कृतीला जपत प्रगती करीत आहे. त्यामुळे आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष, आदिवासी संस्कृती जगाला मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. आदिवासी महानायकांच्या प्रेरणेने समाजाने प्रगती करावी. देशभक्त युवकांचे प्रेरणास्थान व महापुरुषांचे जीवनचरित्र घराघरात पोहोचविण्यासाठी असे जयंती कार्यक्रम घेणे महत्वाचे असल्याचे गजबे म्हणाले.
या कार्यक्रमाला सरपंच अपर्णा राऊत, माजी महिला बालकल्याण सभापती रोशनी पारधी, मार्गदर्शक म्हणून मोहनसिंह गोंड मडावी, उपसरपंच गजानन सेलोटे, भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील पारधी, माजी उपसभापती नितीन राऊत, पोलीस पाटील किरण कुंभलवार, ग्रामसेवक मेघना राऊत, तसेच पंढरी नखाते, भास्कर पत्रे, श्रीराम बुराडे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक आदित्य पुराम यांनी, तर संचालन दुर्गेश आडे यांनी केले. दिनेश पुराम यांनी आभार प्रदर्शन केले.