गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयातील अनुसूचित जातीतील युवक-युवती स्वतःच्या पायावर उभे राहून ते स्वावलंबी व्हावेत, त्यांना कौशल्याचे बळ प्राप्त व्हावे यासाठी बार्टीच्या (डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे) वतीने विद्यापीठात मोफत स्पर्धा परीक्षेचे अनिवासी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात यासंदर्भातील सामंजस्य करार कुलसचिव डॅा.अनिल हिरेखन आणि बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केला.
पुण्यासारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना जायचे झाल्यास राहण्याची व्यवस्था, खानावळ, अभ्यासिका, पुस्तकं, क्लासेस यासारख्या गोष्टीसाठी खूप पैसे लागतात. यामध्ये क्लासेसची फीसुद्धा भरपूर असते. याचबरोबर महिन्याला होणारा खर्च सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारा नाही. पण आता गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना यासाठी कोणताही खर्च येणार नाही.
विद्यापीठातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्यासाठी येणारा खर्च तसेच इतर तत्सम बाबींचा प्रस्ताव विद्यापीठाने सादर केला होता. सदर प्रस्तावास मान्यता प्राप्त झाली असून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि बार्टी यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार अनुसूचित घटकातील युवक-युवतींसाठी स्पर्धा परीक्षेचे मोफत अनिवासी प्रशिक्षण वर्ग गोंडवाना विद्यापीठात सुरू होणार आहे.
हे प्रशिक्षण पूर्णतः निःशुल्क असून प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च बार्टी पुणेमार्फत केला जाणार आहे. या प्रशिक्षणाकरिता विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येणार आहेत. इच्छुक प्रशिक्षणार्थीच्या अर्जामधून निकषांच्या आधारे अर्जांची छाननी करून निवडक उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ६००० रुपयांची शिष्यवृत्तीसुद्धा मिळणार आहे, अशी माहिती या प्रशिक्षणाचे समन्वयक प्रा.डॉ.संतोष सुरडकर यांनी दिली.