सामाजिक उत्तरदायित्वासाठी गोंडवानाने पटकावला ‘फिक्की’चा राष्ट्रीय पुरस्कार

ग्रामसभा सक्षमीकरण प्रकल्पाची दखल

गडचिरोली : फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, अर्थात ‘फिक्की’ या राष्ट्रीय संस्थेकडून गोंडवाना विद्यापीठाला ‘संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्वा’साठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राजधानी दिल्ली येथे पार पडलेल्या 19 व्या ‘फिक्की हायर एज्युकेशन समिट 2024’ या कार्यक्रमात भारतातील ब्रिटिश सरकारच्या उच्चायुक्त लिंडा कॅमरून यांच्या हस्ते गोंडवाना विद्यापीठाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नेहमीच नाविन्यपूर्ण आणि सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाच्या शिरपेचात यानिमित्ताने आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.

‘फिक्की’या संस्थेने संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व या प्रवर्गातून पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव मागितले होते. गोंडवाना विद्यापीठाने सुरु केलेल्या एकल ग्रामसभा सक्षमीकरण कार्यक्रमाचा या पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर केला होता. त्यातील देशातील सहा विद्यापीठांना सादरीकरणासाठी बोलविले. त्यानंतर तीन विद्यापीठांचे नामांकन या पुरस्काराकरिता करण्यात आले. गोंडवाना विद्यापीठाने ग्रामसभा सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठ राबवित असलेल्या ‘गाव तिथे विद्यापीठ’, ‘सीआयआयआयटी’, ‘एसटीआरसी’, या नाविन्यपूर्ण आणि सामाजिक उपक्रमांचाही ‘फिक्की’ने यानिमित्ताने दखल घेत गौरव केला.

गोंडवाना विद्यापीठाने ग्रामसभा सक्षमीकरणासाठी पेसा कायदा, सामूहिक वनहक्क कायदा, जैव विविधता कायदा, वन व्यवस्थापन व संरक्षण, गौण वन उपज रेकॅार्ड व अंकेक्षण यांचे प्रशिक्षण देऊन ग्रामसभांना आतापर्यंत 235 वन व्यवस्थापन आराखडे तयार करण्याकरिता तांत्रिक मदत केली आहे. विद्यापीठाच्या वतीने एकल ग्रामसभा प्रशिक्षण समन्वयक डॉ.नरेश मडावी व डॉ.मनीष उत्तरवार, संचालक ‘ननावसा’ यांनी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारला.