गडचिरोली : गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. राष्ट्रसंतांचे विचार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचावेत, त्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करता यावा यासाठी हे अध्यासन केंद्र सुरू केले जाणार आहे.
गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र सुरू होत आहे. या केंद्राच्या कार्याची रूपरेषा ठरविण्यासाठी कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याप्रसंगी प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, अॅड. गोविंद भेंडारकर, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोझरीचे जनार्धनपंथ बोथे, सुभाष लोहे, गुरुदेव सेवा मंडळ चिमूरचे अशोक चरडे, माजी प्राचार्य डॉ.नामदेव कोकोडे, गुरुदेव सेवा मंडळाचे गोपाळ कडू, अध्यासन केंद्राचे समन्वयक विनायक शिंदे उपस्थित होते. यावेळी या अध्यासन केंद्राबाबत अनेक मुद्यांवर चर्चा करून महत्वाचे निर्णय घेण्यात आले. गुरुदेव सेवामंडळ मोझरीकडून ६५ पुस्तके विद्यापीठाला भेट देण्यात आली.
तुकडोजी महाराजांची आत्मचिंतनपर पुस्तके, वैचारिक ठेवा ४१ भाषांमध्ये उपलब्ध आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनातील प्रेरणादायी भजनांपासून तर सामाजिक सुधारणेसाठी ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांनी केलेले प्रबोधन हा मोठा ठेवा आहे. उत्तम नागरिक घडविण्यासाठी त्यांच्या या साहित्याचा अभ्यास महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केला. या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संपूर्ण जीवनकार्याचा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार आहे.