राजनगरी अहेरीत गोविंदा पथकांची धूम, थर पाहण्यासाठी अभूतपूर्व गर्दी

काय म्हणाले माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, पहा व्हिडीओ

अहेरी : दहीहंडीच्या उत्सवाची क्रेझ केवळ शहरी भागापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. सिरोंचापाठोपाठ अहेरी येथे यावर्षीच्या दहीहंडी उत्सवात अभूतपूर्व गर्दी झाली होती. डीजेच्या तालावर थिरकत, पाण्याचा मारा सहन करत ग्रामीण भागातील गोविंदा पथकांनी थर रचले. यावेळी माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी उपस्थित राहून गोविंदा पथकांचा उत्साह वाढवत त्यांना मार्गदर्शन केले.

गोविंद पथक थरावर थर लावत एकदा नव्हे तर अनेकदा प्रयत्न करून अखेर दहीहंडी फोडतात. त्यांचे ध्येय निश्चित असते. प्रचंड आत्मविश्वास आणि प्रयत्न असतात, त्यामुळेच ते शक्य होते. म्हणून प्रत्येकाला आपले ध्येय गाठायचे असेल तर स्वतःमध्ये आत्मविश्वास असणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन यावेळी अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले. गोविंदा पथक ज्याप्रमाणे एक एक थराला आधार देऊन उंच शिखर गाठतात, त्याप्रमाणे आपल्याला एकमेकांना साथ द्यायची आहे. तेव्हाच आपल्याला ध्येय गाठता येईल, असे ते म्हणाले.

अहेरी येथील कै.विश्वेश्वरराव महाराज चौक (गांधी चौक) येथे विश्व हिंदू परिषद स्थापना दिनी श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती, बजरंग दल, विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा समिती अहेरीद्वारा या भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते झाले. प्रमुख वक्ते म्हणून विश्व हिंदू परिषद भद्रावती प्रखंडचे अध्यक्ष विवेक सरपटवार तसेच भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 31 हजार रुपये श्रीराम गोविंदा पथक, व्यंकटरावपेठा यांना अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते देण्यात आले.