नागपूर विभागीय समितीने केली दिभना ग्रामपंचायतमधील कामांची पाहणी

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानासाठी विभागस्तरावर बाजी मारणार का?

गडचिरोली : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा) सन २०२१-२२ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या दिभना ग्रामपंचायतला दि.३१ रोजी नागपूर विभागस्तरीय समितीने भेट देऊन तपासणी केली. सदर समितीचे अध्यक्ष विवेक इलमे, उपायुक्त (आस्थापणा) नागपूर विभाग, समितीचे सचिव कमलकिशोर फुटाणे, उपायुक्त (विकास) नागपूर विभाग, तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील विस्तार अधिकारी (पंचायत) छत्रपाल पटले, सहायक संसोधन अधिकारी रमेश बागडे यांनी गावातील कामांची पाहणी केली.

समितीच्या सदस्यांनी गावातील स्वच्छताविषयक बाबी, सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी, संस्थात्मक सुविधा, नाली व्यवस्थापन, गावातील पाणी गुणवत्ता विषयक बाबी, लोकसहभाग, नाविन्यपूर्ण उपक्रम इत्यादी विषयांची सखोल पडताळणी केली. यावेळी प्रामुख्याने दिभना गावातील नागरीकांचा, महिलांचा, युवक मंडळ तसेच स्थानिक पदाधिकारी, कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग लाभला. यावेळी गडचिरोलीचे बिडीओ राहुल कुमार मीना (आयएएस), जलजीवन मिशनचे संचालक एफ.आर.कुतीरकर, सहायक बिडीओ धनंजय साळवे, गट शिक्षणाधिकारी परसा, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी फराडे, विस्तार अधिकारी अमोल भोयर आदी उपस्थित होते.

सदर तपासणीच्या नियोजनात सरपंच जेंगठे, सचिव वासंती देशमुख यांनी प्रमुख भूमिका बजावली. तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागार व तज्ज्ञ, पंचायत समिती स्तरावरील कर्मचारी, ग्रामपंचायत बोदली, शिवणी येथील सचिव तसेच स्थानिक नागरीकांनी सहकार्य केले.