गडचिरोली : यावर्षी तेंदूपानांसाठी वाढीव दर न देणाऱ्या ठेकेदारांना पळवून लावण्याचे आवाहन करणारी पत्रके टाकत तेंदूपानांच्या फळीची नक्षलवाद्यांकडून जाळपोळ करण्यात आली. यापूर्वी छत्तीसगडच्या सिमेत अशाच पद्धतीने फळींची जाळपोळ करण्यात आली. त्याची धग आता गडचिरोली जिल्ह्यातही पोहोचली आहे. कंत्राटदारांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य करण्यात आल्याचे बोलले जाते.

प्राप्त माहितीनुसार, दि.३१ च्या रात्री धानोरा तालुक्यातील छत्तीसगड सीमेकडील मुरूमगाव परिसरातील गावात असलेल्या तेंदूपानांच्या तीन फळींची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. त्या ठिकाणी हाताने लिहीलेली काही पत्रकेही आढळली. त्यावर तेंदूपानांसाठी जास्त दर न देणाऱ्या ठेकेदारांना पळवून लावण्याचे आवाहन केले.
यावर्षी अनेक कंत्राटदारांनी तेंदूपाने संकलित करण्याचे काम ग्रामसभांना दिले. त्यामुळे नक्षलवाद्यांना कंत्राटदारांकडून मिळणारी रसद बंद झाली. त्यातून हे कृत्य केल्याचे बोलले जाते. दरम्यान पोलिसांनी या जाळपोळीच्या घटनेला दुजोरा दिला आहे, मात्र ही जाळपोळ नक्षल समर्थकांनी केली असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
































