गडचिरोली : जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर महिला व बाल रुग्णालयाच्या अधीक्षक डॅा.माधुरी किलनाके यांची नियुक्ती झाल्याने विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचा एकत्रितपणे शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या नियुक्तीने योग्य व्यक्तिमत्वाला संधी मिळाली आहे. त्यांच्या सेवेचा आदर्श इतरांनी घ्यावा, अशी भावना यावेळी माजी जि.प. सदस्य तथा साहित्यिक कुसुम अलाम यांनी व्यक्त केली.
गेल्या अनेक वर्षांपासून डॉ.माधुरी किलनाके गडचिरोली जिल्ह्यात रुग्णसेवा देत आहे. आपल्या कामात अतिशय तत्पर व दक्ष राहून परिश्रम घेतात. त्यामुळे गडचिरोलीत सेवा देणाऱ्या इतर डॉक्टरांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा व आदर्श घ्यावा, कुसुम अलाम म्हणाल्या. याप्रसंगी आशा वेलादी, राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, सुनिता उसेंडी, अ.भा.आदिवासी विकास युवा परिषदेचे अध्यक्ष कुणाल कोवे, युवा परिषदेचे अध्यक्ष उमेश ऊईके, सतीश कुसराम उपस्थित होते.