राज्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस भास्कर मेश्राम यांचा कार्यपूर्ती सत्कार

परंपरा कायम ठेवावी - राज्याध्यक्ष दगडे

गडचिरोली : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस, तथा आयटीआय गडचिरोलीचे शिल्पनिदेशक भास्कर मेश्राम हे शासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्या निमित्ताने संघटनेच्या वतीने त्यांचा गौरवपर कार्यपूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, तर उद्घाटक म्हणून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक दगडे, तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त तहसीलदार पुष्पलता कुमरे, जिल्हाध्यक्ष सुनील चडगुलवार, ग्रामसेवक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दामोदर पटले, बुधाजी सुरकर नागपूर, जि.प. महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, चतुर्थश्रेणी संघटनेचे अध्यक्ष लतिफ पठाण उपस्थित होते.

याप्रसंगी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने भास्कर मेश्राम यांचा शाल श्रीफळ, भेटवस्तू देवून तसेच त्यांच्या सहचारिणी मंगला मेश्राम यांचा शाल-श्रीफळ, साडीचोळी देऊन गौरवपर कार्यपूर्ती सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद महासंघ, तहसीलदार/नायब तहसीलदार संघटना, महसुल कर्मचारी संघटना, ग्रामसेवक संघटना, वन विभाग कर्मचारी संघटना, कृषि विभाग कर्मचारी संघटना, आय.टी.आय. कर्मचारी संघटना, बांधकाम विभाग कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

उद्घाटनपर भाषणामध्ये अशोक दगडे यांनी जिल्हा संघटनेच्या कार्यावर समाधान व्यक्त करत संघटनेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्याची गौरव परंपरा कायम ठेवावी. तसेच १६ फेब्रुवारीला सकाळी एक तासाचे वॅाक आऊट करुन केंद्र शासनाच्या धोरणाविरुध्द निदर्शने करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन पेशने यांनी, तर आभार प्रदर्शन किशोर सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमासाठी एस.के.बावणे, सिध्दार्थ मेश्राम, प्रियंका रायपुरे, विजय पत्रे, आशिष सोरते, पियुष आखाडे, कविश्वर बनपुरकर, दिलीप मेश्राम यांनी सहकार्य केले.