अतिदुर्गम, आदिवासीबहुल मेट्टीगुडममध्ये रंगले टेनिस बॅाल क्रिकेटचे सामने

भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन

अहेरी : तालुक्यातील कोंजेड ग्रामपंचायतअंतर्गत समाविष्ट अतिदुर्गम व आदिवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या मेट्टीगुडम येथे माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

शहरी भागात नेहमीच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रत्येक वेळी शहरी भागात येऊन आपल्यातील क्रीडा कौशल्य दाखविणे शक्य होत नसल्याने मेट्टीगुडमवासीयांनी गावातच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरविले. या स्पर्धेसाठी पारितोषिक देण्याची मागणी स्थानिक युवकांनी भाग्यश्री आत्राम यांच्याकडे केली होती. दुर्गम भागातील खेळाडूंमध्ये असलेल्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावा, याही भागातील उत्कृष्ट खेळाडूंना प्रोत्साहन मिळवे या हेतूने सदर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी आवश्यक असलेले पारितोषिक देण्यासाठी भाग्यश्री आत्राम यांनी पुढाकार घेतला.

या स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुनीता मडावी, उपसरपंच सीताराम मडावी, शंकर मडावी, सुधाकर कलकोटवार, हनमंतु वेलादी, संजय येमसलवार, गोसाई वेलादी, मुकुंद तेलाम, कैलास चौधरी, मुन्ना वेलादी तसेच परिसरातील नागरिक, खेळाडू तसेच क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.