देसाईगंजची रुची शास्रकार जिल्ह्यात प्रथम, तर गडचिरोलीची माही उराडे द्वितीय स्थानी

बारावीत गडचिरोलीचा 94.42 टक्के निकाल

गडचिरोली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल 21 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. यात गडचिरोली जिल्ह्यातील 94.42 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवत नागपूर विभागात तृतीय स्थान मिळवले. देसाईगंजच्या कुथे पाटील विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयाच्या रूची किशोर शास्त्रकार हिने 92.67 टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला.

या परीक्षेत गडचिरोलीच्या शिवकृपा कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी माही हंसराज उराडे ही 92.50 टक्के गुण घेऊन जिल्ह्यात द्वितीय आली आहे, तर आरमोरीच्या महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयाच्या संचित संजय उराडे याने 92.33 टक्के गुणांसह तृतीय स्थान पटकावले.

शिवाजी महाविद्यालयाचे 19 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोलीद्वारा संचालित शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा यावर्षीही कायम राखली. या विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे. रेवा प्रेमेंद्र मेश्राम ही विद्यार्थिनी 83.50 टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आली आहे. द्वितीय मनस्वी रुपेश पेंदाम (82.17 टक्के), तर तृतीय प्रियंका प्रदीप बाला (81.83 टक्के) आणि तमन्ना मोंगरकर व अनिष्का खांडारे यांनी 81.17 टक्के गुण घेतले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॅालॅाजीचा आयुष पिल्लीवार याने 79.50 टक्के गुण घेऊन या शाखेत जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

या कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातून 312 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 19 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, 115 प्रथम श्रेणीत, 155 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 23 विद्यार्थी पास श्रेणीत असे एकंदरीत 312 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कनिष्ठ महाविद्यालयात संस्थाध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.प्रवीण खोब्रागडे तर आभार प्रा.अनिल धामोडे यांनी मानले.

लोकबिरादरी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 97.20 टक्के

भामरागड तालुक्यातील हेमलकसाच्या लोकबिरादरी कनिष्ठ कला महाविद्यालयातील बारावीचा निकाल 97.20 टक्के लागला. या शाळेतून अश्विनी मिच्छा मादी हिने 76.50 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. महिना जुजा मडावी (76 टक्के), लक्ष्मी राजू पुंगाटी (74.67 टक्के), प्रभाकर संभा सडमेक (73.67 टक्के आणि निर्मला दोगे नरोटी (73.67) अशी टॅाप 5 विद्यार्थ्यांची टक्केवारी आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे डॅा.प्रकाश आमटे यांनी अभिनंदन केले.