भर चौकात लोखंडी रॅाड आणि पावड्याने मारून हत्या करणाऱ्या बापलेकाला जन्मठेप

कोंढाळा येथील सात वर्षांपूर्वीचा थरार

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे सात वर्षांपूर्वीच्या तान्हा पोळ्याला भरचौकात एका इसमाची लोखंडी रॅाड आणि पावड्याने मारून हत्या झाली होती. यातील आरोपी मुलगा आणि त्याच्या वडीलासह एका सहकाऱ्याला विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात न्यायालयाने तीनही आरोपीना मिळून 2 लाख 75 हजार रुपये दंडसुद्धा ठोठावला असून ती रक्कम मृत इसमाच्या विधवा पत्नीला देण्याचा आदेश दिला आहे. हा निकाल विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम एम.मुधोळकर यांनी दिला.

सविस्तर असे की, देसाईगंज येथे दि.24/08/2017 रोजी तान्हापोळ्याच्या दिवशी संध्याकाळी 7.30 ते 7.45 वाजताच्या सुमारास दिनेश दिगांबर झिलपे (37 वर्ष) रा.कोंढाळा याची भर चौकात आरोपी श्यामराव सोमा अलोने, त्याचा मुलगा आरोपी विनायक श्यामराव अलोने आणि आरोपी राजू ढोरे, सर्व राहणार कोंढाळा यांनी गोपाल कसारे यांच्या पानठेल्याजवळ लोखंडी रॉड व पावड्याने मारुन हत्या केली होती. त्यानंतर मृतदेह कोंढाळा ते रवी रोडवरील जंगलामध्ये फेकुन दिला.

याबाबत मृताचे वडील दिगांबर झिलपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून देसाईगंज पोलिसांनी गुन्हा नोंदवून या खुनातील आरोपी तीन आरोपींना दि.27/08/2017 रोजी अटक केली होती. तपासामध्ये असे निदर्शनास आले की, मृत दिनेश याला दारुचे व्यसन होते. आरोपी श्यामराव अलोने याने त्याच्या दुकानासमोर एक वर्षापुर्वी मृत दिनेश याच्या पायावर व डोक्यावर कु­ऱ्हाडीने वार केला होता. परंतु त्याच्या उपचाराचा खर्च हा आरोपी श्यामराव याने केला होता. त्यामुळे त्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली नव्हती. परंतु काही दिवसांनी आरोपी श्यामराव व त्याचा मुलगा विनायक हे पैशाची मागणी करु लागले. त्या जुन्या रागातून सदरचे हत्याकांड घडून आल्याचा निष्कर्श पोलिसांनी काढला.

घटनेच्या दिवशी मृत झिलपे याची पत्नी निता दिनेश झिलपे ही मृताला चौकातून घरी आणण्यासाठी गेली असता, तिच्या पतीला तिन्ही आरोपी पावड्याने व लोखंडी रॉडने मारहाण करीत असल्याचे दिसले. याबाबत तिने तिचे सासरे दिगांबर झिलपे यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस स्टेशनला ही माहिती देण्यात आली. घटनास्थळावर मृत इसमाचा देह आढळला नाही, परंतु चप्पल, मोबाईल व रक्ताने माखलेली जागा दिसून आली. आरोपीला अटक केल्यानंतर मृतदेह, आरोपी श्यामराव यांनी लपवुन ठेवलेली जागा दाखविली. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल व इतर पुरावे सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केले. त्यावरुन विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी आरोपी शामराव अलोने व राजू ढोरे (36 वर्षे) दोन्ही रा.कोंढाळा यांना दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी 1 लाख रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. तसेच आरोपी विनायक अलोने, (वय 37 वर्षे), यास कलम 302 अंतर्गत दोषी ठरवुन जन्मठेप व 75,000 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची एकूण रक्कम रु.2 लाख 75 हजार मृत इसमाची विधवा पत्नी निता दिनेश झिलपे हिला देण्याबाबतचा आदेश पारित करण्यात आला.

या प्रकरणात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान व सहायक सरकारी वकील निलकंठ भांडेकर यांनी कामकाज पाहिले. तसेच गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे, सपोनि./अतुल श्रावन तावाडे यांनी केला.