गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्वाचा टप्पा असणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा (स्टेट बोर्ड) निकाल आज (दि.5) दुपारी 1 वाजता आॅनलाईन जाहीर होणार आहे. यावर्षी राबविलेल्या कॅापीमुक्त अभियानामुळे निकाल कसा लागतो याची उत्सुकता विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही लागली आहे. जिल्ह्यातील 13 हजार 400 विद्यार्थ्यांनी यावर्षी बारावीची परीक्षा दिली आहे.
राज्यातील 9 विभागीय शिक्षण मंडळांमार्फत मार्च 2025 मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली. सोमवारी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होईल. तो शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार असून डीजीलॅाकर अॅपमध्ये डीजीडल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील बऱ्याच इंग्रजी माध्यमाच्या मोठ्या शाळांमध्ये सीबीएसई बोर्डचा अभ्यासक्रम लागू आहे. मात्र स्टेट बोर्डमधून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जिल्ह्यात जास्त आहे. त्यामुळे निकाल काय लागतो याची उत्सुकता विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना लागली आहे.