अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्र हे अतिदुर्गम भाग असल्याने येथील विविध आजारांच्या रुग्णांना जिल्हा मुख्यालय किंवा चंद्रपूर, नागपूर यासारख्या शहरात जाऊन उपचार घेणे शक्य होत नाही. त्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात ‘मावा स्वास्थ्य मावा अधिका’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम आणि डॉ.मिताली आत्राम यांच्या पुढाकारातून पहिल्यांदाच अहेरी येथे भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 4 ऑगस्ट रोजी इंडियन फंक्शन हॉल येथे झालेल्या या शिबिरात 600 पेक्षा अधिक रुग्णांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
अनेक वयोवृद्ध आणि इतर नागरिकांमध्ये नेत्रदोष, मोतीबिंदू यासारखे आजार दिसून आल्याने या रुग्णांना एकाच दिवशी व एकाच ठिकाणी योग्य उपचार व सल्ला मिळावा या हेतूने अहेरीच्या इंडियन फंक्शन हॉल येथे या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिरात डॉ.ध्रुबोज्योती साहा, डॉ.स्नेहा अग्रवाल या तज्ज्ञ डॉक्टरांनी व त्यांच्या चमूने नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी व मोफत उपचार केले. शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील तारीख देण्यात आली. अहेरी उपविभागातील एटापल्ली, अहेरी, मुलचेरा तालुक्यातील शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात आलेल्या रुग्णांची योग्य काळजी घेण्यात आली. तसेच त्यांच्यासाठी जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. या शिबिरासाठी हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या चमूने अथक परिश्रम घेतले. या नेत्र तपासणी शिबिरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यामुळे सकाळी 10 वाजेपासून तर सायंकाळी 4 वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी करून औषधोपचार सुरू होते.
आत्राम दाम्पत्याचा अभिनव उपक्रम
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे सुपूत्र व माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आणि सून डॉ.मिताली भलावी-आत्राम यांनी अहेरी उपविभागात ‘मावा स्वास्थ मावा अधिकार’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत खेड्यापाड्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा दिली जात आहे. विशेष म्हणजे डॉ.मिताली आत्राम ह्या वैद्यकीय क्षेत्रातून असल्यामुळे आणि त्यांनी स्वतःला या क्षेत्रात झोकून दिल्याने दुर्गम भागातील नागरिकांना मोठा फायदा होत आहे. त्यांच्याकडे दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोठी चमू देखील उपलब्ध आहे. सतत खेड्यापाड्यात शिबिर घेऊन आरोग्य तपासणी व औषधोपचार केले जात आहेत.