सिरोंचा : मौल्यवान सागवानासाठी प्रसिद्ध असलेल्या सिरोंचा भागातून नदीमार्गे तेलंगणा राज्यात सागवानाची तस्करी नेहमीच होते. पण नुकताच पूर ओसरलेला असताना आणि नद्या तुडूंब भरून वाहात असतानाही सागवानाची नदीमार्गे मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वनविभागाने चार लाखांची लाकडं जप्त केली, मात्र एकाही आरोपीला पकडण्यात यश आले नाही.
सिरोंचा तालुक्यातील जंगलावर तेलंगना आणि छत्तीसगड राज्यातील सागवान तस्करांची नजर आहे. त्यातूनच मागील अनेक वर्षापासून येथील सागवानाची तस्करी सुरूच असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील झिंगानूर वनपरिक्षेत्रातील येडसील उपक्षेत्रात वाहत असलेल्या नदी पात्रातून अवैधरित्या सागवानाच्या लाकडांचे तराफे बनवून ते नदीपात्रात सोडलेले होते. यासंदर्भातील गुप्त माहिती मिळताच झिंगानूर वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी ती लाकडे पकडली.
वाहत असलेल्या पाच तराफ्यांत तब्बल ३० नग सागवान लाकूड जप्त करण्यात आले. हे सागवान 5.663 घनमीटर असून त्याची किंमत 4 लाख 9 हजार 60 रुपये एवढी आहे. हे सागवान वनविभागाने कापून साठवलेले आहेत की, तस्करांनी अवैधरित्या कापलेले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सिरोंचा वनविभागात सिरोंचा आसरअली, देचली, बामणी, जिमलगट्टा, झिंगानूर, कमलापूर आणि प्राणहिता असे एकूण आठ वनपरिक्षेत्र कार्यालय आहेत. यातील सिरोंचा, आसरअली, देचली आणि झिंगानूर या वनपरिक्षेत्रातील जंगलावर तस्करांची वक्रदृष्टी आहे. पण भर पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नदी नाल्यातून तराफ्याच्या साह्याने सागवान तस्करी होणे हे वनविभागाची चिंता वाढविणारे आहे.