गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगावचे रहिवासी डॅा.प्रमोद साळवे यांच्या वनहक्काच्या दाव्याचा प्रस्ताव प्रलंबित असताना आणि कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता त्यांच्या निवासस्थानाची संरक्षक भिंत आणि लगतचा बौद्ध विहाराचा चबुतरा तोडण्यात आला. या नियमबाह्य कारवाईत आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करणाऱ्या वनपरिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी डॅा.साळवे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केली आहे.

यासंदर्भात डॅा.साळवे यांनी पत्रकार परिषद घेऊन वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या आततायीपणाची माहिती दिली. चातगाव येथे आयुर्वेद उत्कर्ष मंडळ या संस्थेला 2011 मध्ये वनजमिनीचा पट्टा मिळाला आहे. शिवाय वैयक्तिक वनपट्ट्याचा प्रस्ताव जिल्हा वनसमितीकडे प्रलंबित आहे. डॅा.साळवे यांच्या निवासस्थानाला लागूनच त्यांच्या जागेत बौद्ध विहारासाठी चबुतरा बांधलेला होता. ग्रामसभेने यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर नियमांना डावलून आरएफओ सोनटक्के यांनी ऐन बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी तो चबुतरा तोडला. त्यामुळे बौद्ध समाजबांधवांच्या भावना दुखावणाऱ्या सोनटक्के यांच्यावर निलंबनाची कारवाई करून अॅट्रॅासिटी कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी डॅा.साळवे यांच्यासह नारायण सयाम, विनायक सोरते, राजू चक, सानू कोंडागोर्ला, अनिल मेश्राम, पियुष नंदेश्वर, प्रशांत कोंडागोर्ला, नितीन अलूर आदींनी पत्रकार परिषदेत केली.
वनपट्ट्याबाबत जोपर्यंत जिल्हा वनसमितीकडून अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत वनविभागाने कोणतेही अतिक्रमण हटवू नये, असे 11 नोव्हेंबर 2016 च्या शासन निर्णयात नमूद आहे. मात्र या प्रकरणात अपिल सुरू असताना, म्हणजे अंतिम निवाडा अद्याप झालेला नसताना वनविभागाच्या अधिकाऱ्याने आततायीपणा करत शासन आदेशाची पायमल्ली कोणाच्या सांगण्यावरून केली? असा सवाल डॅा.साळवे यांच्यासह गावकऱ्यांनी केला आहे.
यासंदर्भात उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा यांना विचारणा केली असता ते म्हणाले, अतिक्रमित जागेवर पक्के बांधकाम करता येत नाही. चातगावच्या प्रकरणात ग्रामसभेने तक्रार केली होती. पण अतिक्रमण हटविण्याची कारवाई करताना वनपरिक्षेत्राधिकाऱ्याने कोणकोणत्या कायदेशिर प्रक्रियेचे पालन केले, यासंदर्भात सविस्तर माहिती घ्यावी लागेल, असे ते म्हणाले.
या प्रकरणात काही लोकांकडून संघटित गुन्हेगारीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातूनच हा प्रकार घडल्याचा आरोप करत वनपरिक्षेत्राधिकारी सोनटक्के यांच्यासह परशुराम मोहुर्ले व रंजित राठोड यांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचेही डॅा.साळवे यांनी सांगितले.