पोलिसांचे लक्ष आता अबुझमाडवर, नक्षलवाद्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न

गडचिरोली पोलिसांनी वाढवले अभियान

गडचिरोली : जिल्ह्यातून नक्षलवाद हद्दपार करण्याचा निश्चय करत गडचिरोली पोलिसांनी आता आपले लक्ष छत्तीसगड सीमेकडील अबुझमाडच्या प्रदेशावर केंद्रित केले आहे. भामरागड तालुक्याअंतर्गत येणाऱ्या या प्रदेशात नक्षलवाद्यांचा वावर असतो. तो संपवण्यासाठी नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे. त्याअंतर्गत सोमवारी नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करत त्यांच्या अस्तित्वाला पोलिसांनी सुरूंग लावला आहे.

गेल्या दोन वर्षात नव्याने उभारलेल्या 6 पोलीस स्टेशनमुळे भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांची बरीच कोंडी होत आहे. तरीही अधूनमधून छत्तीसगडमधून येऊन ते अबुझमाडचा प्रदेश म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील जंगलात कुरापती करत असतात. दोन दिवसांपूर्वी त्यांचा कॅम्प या भागात लागला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे सी-60 पथकाच्या 200 जवानांनी त्या दिशेने आगेकुच केली. यावेळी उडालेल्या चकमकीत काही माओवादी जखमी झाले किंवा मारले गेले असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. पण त्यांना जखमी अवस्थेत नक्षलवाद्यांनी आपल्यासोबत नेल्याने ते पोलिसांच्या हाती लागले नाही. मात्र त्यांच्याकडील दोन रायफलींसह इतर साहित्य घटनास्थळी सापडले, ते पोलिसांनी जप्त केले.

भामरागड तालुक्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस स्टेशन कवंडेजवळ माओवाद्यांच्या भामरागड दलमने घातपात करण्याच्या उद्देशाने तळ उभारला होता. या माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-60 च्या सुमारे 200 जवानांकडून विशेष अभियान राबवण्यात आले. यावेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तास चकमकी उडाल्या. या चकमकीनंतर परिसरात करण्यात आलेल्या शोधमोहीमेदरम्यान एक स्वयंचलित इन्सास रायफल, एक सिंगल शॉट रायफल, एक मॅगझिन, अनेक जिवंत काडतुसे, डिटोनेटर, एक रेडिओ, तीन पिट्टु (सामानाची पिशवी), वॉकीटॉकी चार्जर इ. मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य आणि वैयक्तिक वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या. त्या भागात अजूनही नक्षलविरोधी अभियान सुरूच आहे.