गांजा तस्करी करणाऱ्या एका तरुणीसह दोन तरुणांना मध्यरात्री अटक

स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला ७ लाखांचा मुद्देमाल

गडचिरोली : चंद्रपूर शहरातील एका तरुणीसह दोन तरुणांना एका वाहनातून गांजाची तस्करी करताना गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्या तिघांनाही अटक केली असून न्यायालयाने त्यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडीही सुनावली आहे. ही कारवाई गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील इंदिरानगर वनतपासणी नाक्यावर मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, दि.२७ च्या रात्री गांजा तस्करी करणारे एक वाहन चंद्रपूरकडून येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या परवानगीने सदर पथकाने इंदिरानगर येथील वनउपज तपासणी नाक्यावर नाकाबंदी केली. यावेळी एमए ३४, बीआर ४०८६ या वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या डिक्कीत ६.६४ किलोग्राम गांजा सापडला. यावेळी वाहनातील आरोपी आशिष धनराज कुळमेथे (२८ वर्ष, रा.संजयनगर, चंद्रपूर), धनराज मधुकर मेश्राम (३३ वर्ष) रा.नेहरूनगर, चंद्रपूर आणि ज्योती श्रीकृष्ण परचाके (२२ वर्ष) रा.शास्रीनगर, चंद्रपूर या तिघांना अटक करण्यात आली.

जप्त केलेल्या गांजाची किंमत ९९ हजार ६४६ रूपये आहे. याशिवाय ६ लाखांचे वाहन आणि २० हजार रुपये किमतीचे मोबाईल असा ७ लाख १९ हजार ६९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या आरोपींविरूद्ध गडचिरोली पोलीस स्टेशनला गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम (एन.डी.पी.एस.) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संघमित्रा बांबोळे करीत असुन आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे नेतृत्वात सहायक पो.निरीक्षक रुपाली पाटील, हवालदार नरेश सहारे, हेमंत गेडाम, नायक सतीश कत्तीवार, राकेश सोनटक्के, शिपाई उमेश जगदाळे, सचिन घुबडे, माणिक दुधबळे, हवालदार लक्ष्मी बिश्वास, सविता उसेंडी, चालक माणिक निसार, मनोहर टोगरवार यांनी पार पाडली.

दुचाकीसह 1.67 लाखांची दारू जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विहीरगाव येथील चौकात रात्रीच्या वेळी सापळा रचुन अवैधरीत्या देशी व विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या लखबिरसिंग बावरी आणि भुषण मेश्राम यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 87 हजार रुयये किमतीची देशी व विदेशी दारु, दारु वाहतुक करण्याकरीता वापरलेली ६० हजार रुपये किमतीची दुचाकी तसेच २० रुपये किमतीचा मोबाईल असा एकुण 1,67,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपींविरूद्ध देसाईगंज पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाईसुद्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.