खड्डेमय आलापल्ली ते अहेरी रस्ता होणार गुळगुळीत

आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी उपस्थित आ.धर्मरावबाबा आत्राम, भाग्यश्री आत्राम.

अहेरी : गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून आलापल्ली ते अहेरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत होता. खड्ड्यांसोबत उखडलेल्या रस्त्यामुळे धुळीचे लोळ उठत होते. अखेर या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून हा रस्ता आता खड्डे आणि धूळमुक्त होऊन गुळगुळीत होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली अंतर्गत येत असलेल्या या आलापल्ली ते अहेरी रस्त्याच्या कामाचे आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते दि.२९ ला भूमिपूजन करण्यात आले.

अहेरी हे तालुक्याचे ठिकाण असून मुख्य बाजारपेठ असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या मार्गावरून जाणाऱ्यांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत होता. या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे म्हणून नागरिकांची मागणी होती. अखेर निधी प्राप्त झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आलापल्ली येथील सिरोंचा पुलापासून सदर काम होणार आहे. सदर भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी माजी जि. प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, सार्वजनीक बांधकाम विभाग आलापल्लीचे कार्यकारी अभियंता बलवंत रामटेके तसेच संबंधित कंत्रादार उपस्थित होते.