प्रासंगिक / वैशाली मडावी
कोकण म्हटलं की आपल्याला तिकडच्या नारळाच्या बागा, हापूस आंबे, फणस त्याचबरोबर तिथले समुद्रकिनारे इत्यादी आठवतात. याच कोकणच्या भूमीला परशुरामाची भूमी असेही संबोधले जाते. पण याच कोकणात अनेक देवींची जागृत देवस्थानेही आहेत आणि अशा प्रत्येक देवस्थानाची काही ना काही कथा आणि त्यामागे इतिहास देखील आहे.
तुम्ही कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भटकंती करीत असाल आणि एखाद्या मंदिरामध्ये जर वारूळ दिसत असेल तर आश्चर्यचकित होऊ नका. ती वारुळे नुसती वारुळे नसून मंदिराचाच अविभाज्य भाग, म्हणजे देवी आहे. देवीचं वास्तव्य त्या वारुळात आहे. कोकणात वारुळ आणि सातेरी देवस्थान असे समीकरण दिसून येते. सातेरी देवी ही नागकन्या असल्याने कोकणात सातेरी देवीच्या मंदिरात मोठी वारुळे आढळतात. या वारूळ महिम्यावर एक टाकलेला प्रकाशझोत. काय आहेत ती वारुळं आणि मंदिराच्या आतमध्ये कशी काय आहेत वारुळे? लोक त्या वारुळांची पूजा का करतात? त्याचाच शोध या लेखाच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. अशी एक-दोन नाही तर तब्बल 79 मंदिरे सातेरी नावाने सिंधुदुर्गात आहेत. अशाच काही महत्त्वाच्या अतिप्राचीन आणि जागृत सातेरी देवीच्या मंदिरांबद्दल आज आपण जाणून घेऊया.
वेंगुर्ले गावातील दोन प्रसिद्ध सातेरी देवीची महिमा
वेंगुर्ले तालुक्यातील मापन गावची ग्रामदैवत श्री देवी सातेरी म्हणजेच शांतादुर्गा नावाने प्रसिद्ध आहे. देवी सातेरी ही नागकन्या असल्याने कोकणात सातेरी देवीच्या मंदिरात मोठी वारुळे आढळतात. सातेरी हा शब्द कन्नड ‘सप्ततेरी’ शब्दावरून तयार झाला आहे. याचा अर्थ सप्त म्हणजे सात आणि तेरी म्हणजे थर. असे म्हणतात की वारुळाला सात थर असतात. सिंधुदुर्गात सातेरी देवीची एकूण 79 मंदिरे पाहायला मिळतात. ही शांतादुर्गा देवी वारुळातूनच प्रकट झालेली आहे, असे जाणकार सांगतात. या वारुळाच्या बाजूला देवीची मातीची मूर्ती असून त्यावर कोणताही परिणाम होत नाही. देवीच्या मूर्तीची पाणी व अन्य कारणाने झिज झाल्यास वारुळाची माती दुधात कालवून लावली जाते. देवीचा गाभारा लाकडी असून वारूळ त्याला टेकलेले आहे. तसेच देवीच्या मागे आरसा पाहायला मिळतो त्याचे कारण असे की आपल्याला दिसणाऱ्या देवीच्या चेहऱ्याच्या मागे देवीचा पुढचा भाग हा आपण आरशात बघू शकतो वारुळातील माती हे ग्रामस्थ औषधाप्रमाणे उपयुक्त मानतात. याचा वापर करून बरेच आजार दूर होतात अशी त्यांची श्रद्धा आहे.
दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. सिंधुदुर्गातील 79 सातेरी मंदिरांपैकी हे एक मंदिर. त्यानंतर वेंगुर्ले गावातीलच दुसरी सातेरी देवीची कथा. ही देवी आपल्या भक्तांसाठी सहा मैल अंतरावरून येऊन या गावात प्रकटली आहे. वेंगुर्ले हे नाव गावाला कसे पडले त्याचीही एक कथा प्रसिद्ध आहे. त्या कथेचा संबंध देवी सातेरीशी आहे. ही देवी मूड अनसुर येथील वेंगुर्लेवरून सहा मैल अंतरावर हे गाव आहे. त्या काळातील परब कुटुंबातील एक पुरुष नित्यनेमाने वेंगुर्लेहून सहा मेल चालत अनसुर येथील देवीची पूजाअर्चा करीत असे. त्या काळी वेंगुर्ले हे शहर अस्तित्वात नव्हते. पुढे वृद्धापकाळाने चालत जाणे अशक्य होऊ लागल्याने त्यांनी देवीला मनोभावे आपली व्यथा सांगितली. एके दिवशी देवीने प्रसन्न होऊन दृष्टांत दिला. देवीने सांगितले की, तुझी गाय ज्या ठिकाणी पान्हा सोडेल त्या ठिकाणी मी आहे. त्याप्रमाणे शोध घेतल्यावर गाईने पान्हा सोडलेल्या पाषाणावर मातीचे वारूळ झरझर वाढू लागले. हे पाहून त्याने आनंदाने वारुळास मिठी मारली व सांगितले आई तू आता इथेच राहा. त्याबरोबर वारुळाची मिठी थांबली. मिठी म्हणजे वेग हा शब्द त्याकाळी प्रसिद्ध होता. वारुळे वेग मारून उरले. त्यावरूनच वेंगुर्ले असे नाव झाले.
सातेरी मंदिर म्हटले की वारुळ असतेच, पण या मंदिरातील मूर्तीच ही वारुळाच्या मातीपासून बनलेली आहे. त्यानंतर आपण पाहूया सातेरी देवीची तिसरी कथा. ही देवी स्वयंपाक घरातील चुलीमधून प्रकटली आहे. ही सातेरी देवी सिंधुदुर्गच्या पावशी कुराड तालुक्यातील आहे. स्वयंभू मंदिरात सुमारे 20 फूट उंचीचे वारूळ पहायला मिळते. या मंदिराच्या निर्मितीची कथा वैशिष्ट्यपूर्ण आहे. सातेरी देवीचे जिथे मंदिर आहे तिथे पूर्वी एक घर होते. त्या घरामध्ये महाडेश्वर कुटुंब राहात होते. त्यांच्या स्वयंपाक घराच्या चुलीत नेहमी वारूळ निर्माण व्हायचे. ते वारूळ पाडण्याचा नेहमीच प्रयत्न करायचे. एकदा त्यांच्या चुलीत वारूळ निर्माण झाले व ते 20 ते 25 फूट वाढले. यावेळी मात्र चुलीतील हे वारूळ घरातल्या मंडळींना पाडता आले नाही. त्या रात्री सातेरी देवीने त्यांना दृष्टांत दिला की मी या वारुळात माझा वास करत आहे. हे ऐकताच त्यांना आनंद झाला आणि त्यांनी देवीची पूजाअर्चा करून तिची स्थापना केली, अशी अख्यायिका आहे. ही घटना सुमारे 500 वर्षांपूर्वीची असावी असे म्हटले जाते.
या मंदिरामध्ये नीळ लावण्याचा कार्यक्रम होतो. हा खूप प्रसिद्ध आहे. त्याला नीळ उत्सव म्हणतात. हा कार्यक्रम मे महिन्यात दुसऱ्या सोमवारी होतो. या दिवशी 20 ते 25 किलो तांदळाची पेज केली जाते. हे तांदूळ देवस्थानाच्या जमिनीतील भाताचेच असतात. त्या पेजेत नीळ मिसळून सारे वारूळ रंगविले जातात. पारंपरिक वाद्याच्या निनादात हा कार्यक्रम पार पाडला जातो. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र व इतर काही भागातून येथे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. सातेरी देवी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. बोललेले नवस ही देवी सातेरी पूर्ण करते. अशा आदिशक्तीस माझे शतशः नमन.
– वैशाली प्रवीण मडावी
मुख्याध्यापिका, राणी दुर्गावती कन्या विद्यालय तथा क.महाविद्यालय गडचिरोली