गडचिरोली : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उद्घाटन आज (दि.9) दुपारी 12 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॅान्फरन्सिंग) होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रसाद नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम तसेच इतर लोकप्रतिनिधीही दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित राहतील, असे अधिष्ठाता डॉ.अविनाश टेकाडे यांनी कळविले आहे.
तूर्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात उभारलेल्या स्वतंत्र इमारतीतून या मेडिकल कॅालेजचे कामकाज चालणार आहे. याशिवाय नर्सिंग कॅालेजचीही इमारत तात्पुरती मेडिकल कॅालेजसाठी घेण्यात आली आहे. यावर्षी 100 जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या प्राध्यापक डॅाक्टरांच्या नियुक्त्या शासनाकडून करण्यात आल्या आहेत.
मा.खा.अशोक नेते यांचा पाठपुरावा
आकांक्षित गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला आरोग्याची दर्जेदार सेवा मिळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारावे असा संकल्प करत खासदार म्हणून अशोक नेते यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या वैद्यकीय महाविद्यालयामुळे तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा जिल्ह्यातील नागरिकांना मिळेल आणि रुग्णांना चंद्रपूर किंवा नागपूरला जाण्याची गरज पडणार नाही. यासाठी लोकसभेच्या सभागृहात त्यांनी अनेक वेळा तारांकित प्रश्न मांडला. एवढेच नाही तर केंद्रीय आरोग्य तथा राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना भेटून या मेडिकल कॅालेजची गरज गडचिरोलीत का आहे हे पटवून दिले. त्याचाच परिपाक म्हणून मेडीकल कॅालेजला मंजुरी मिळून आज या कॅालेजचे उद्घाटन होत आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा अत्यंत आनंदाचा आणि संकल्पपूर्तीचा दिवस आहे, अशी भावना माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (अनुसूचित जनजाती मोर्चा) अशोक नेते यांनी व्यक्त केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींचे आभारही मानले.