गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि.१२) भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणातील महत्वाचा टप्पा असणाऱ्या ८५ हजार कोटींपेक्षा जास्त निधीच्या अनेक योजनांचे लोकार्पण आणि भूमिपूजन ऑनलाइन पद्धतीने केले. त्यात गडचिरोली-चिमूर मतदार संघातील नागभीड रेल्वे स्थानकावर जनऔषधी केंद्र, तर वडसा, ब्रह्मपुरी, नागभिड रेल्वे स्टेशनवर ‘वन स्टेशन वन प्रॅाडक्ट’ स्टॅालचे लोकार्पण करण्यात आले. वडसा रेल्वे स्टेशनवर भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत स्टॅालचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आ.कृष्णा गजबे, रेल्वे अभियंता आर.के.दैवांगन, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, तालुकाध्यक्ष सुनील पारधी, कुरखेडा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, माजी सभापती रोशनी पारधी, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष बेबीनंदा पाटील, हेमा कावळे, अर्चना ढोरे, वसंता दोनाडकर, भास्कर बुरे, प्रमोद झिलपे तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
वडसा, ब्रह्मपुरी आणि नागभिड रेल्वे स्टेशनवर सुरू करण्यात आलेल्या या स्टॅालमध्ये स्थानिक स्तरावर तयार होणाऱ्या विविध वस्तू, पदार्थांची विक्री होणार आहे. त्यामुळे मागास भागातील बांबूच्या वस्तूंपासून मोहफुलाचे लाडू, शरबत यासारख्या अनेक वस्तूंना बाजारपेठ मिळून त्यांच्या उत्पन्नात मोठी भर पडेल. एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या शेतातील फलोत्पादनासारख्या मालाला बाजारपेठ मिळेल, असा विश्वास यावेळी खा.नेते यांनी व्यक्त केला. याशिवाय नागभीड रेल्वे स्थानकावर जनऔषधी केंद्र सुरू करण्यात आले. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना स्वस्त दरात औषधी उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले. या सर्व सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खा.नेते यांनी केले.
यावेळी खा.नेते म्हणाले, रेल्वेसंबंधी अनेक प्रश्न मी मार्गी लावले आहेत. या लोकसभा क्षेत्रातील रेल्वे स्टेशनवर अनेक सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनचा थांबा दिला आहे. यासोबत कळमना ते राजनांदगाव (छत्तीसगड) या स्थानकांदरम्यान तिसऱ्या रेल्वेलाईनचे काम पूर्ण होत आहे. गडचिरोली-चिमूर क्षेत्रातील आमगाव, सालेकसा, दरेकसा या रेल्वे स्थानकांमधून जाणाऱ्या या रेल्वे लाईनमुळे रेल्वेमार्गावरील गाड्यांची वाहतूक वाढून नवीन गाड्या सुरू करण्यास वाव मिळणार आहे. लोकसभा क्षेत्रात आणखी काही नवीन रेल्वेमार्गाचे जाळे विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
विशेष म्हणजे यापूर्वी खा.नेते यांच्या पुढाकाराने वडसा आणि आमगाव (जि.गोंदिया) या रेल्वे स्थानकांचा अमृत भारत स्टेशनमध्ये समावेश करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचेही उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले. या रेल्वे स्थानकांचा कायापालट होत असल्यामुळे रेल्वे प्रवाशांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा मिळणार आहेत. वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचे काम झपाट्याने सुरू आहे. गेल्या कित्येक वर्षात जी कामे मार्गी लावणे कोणाला जमले नाही ती कामे माझ्या पाठपुराव्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टिने मार्गी लागत आहेत, असे खा.नेते यावेळी म्हणाले.