गडचिरोली पोलिस दलाने शोधून काढले चोरलेले व हरवलेले ५२ मोबाईल

सायबर पोलिस ठाण्याचे यश

गडचिरोली : मोबाईलचा वापर दिवसागणिक वाढत आहे. पण मोबाईल हाताळताना, प्रवासादरम्यान अनेकांचे मोबाईल हरविले, तर काहींचे चोरी गेले आहेत. असे 52 मोबाईल पोलिसांच्या सायबर शाखेने शोधून काढले. संबंधित मोबाईलधारकांना बोलवून त्यांना हे मोबाईल परत देण्यात आले.

हरविलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलसंबंधी पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर ती सायबर पोलिस स्टेशनकडे पाठविली जाते. मोबाईल हरवला किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलव्दारे सायबर गुन्हे घडण्याची जास्त शक्यता असल्यामुळे हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक असते. या बाबींचा विचार करुन सायबर पोलिस स्टेशनमार्फत हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येतो.

मागील वर्षी सन 2023 मध्ये एकुण 135 मोबाईलचा शोध घेण्यात आला होता. त्यांची अंदाजे किंमत 20 लाख 27 हजार रुपये एवढी होती. तसेच जानेवारी 2024 ते मार्च 2024 पर्यंत एकुण 52 मोबाईल आणि एक टॅब शोधण्यात यश आले. त्यांची किंमत 7 लाख 31 हजार 752 एवढी आहे. हे मोबाईल बुधवारी संबंधितांना पोलिस मुख्यालयातील एकलव्य धाम येथे बोलावून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोनि उल्हास भुसारी, पोउपनि निलेश वाघ, अंमलदार श्रीनिवास संगोजी, वर्षा वहिरवार, संगनी दुर्गे, गायत्री नैताम व किरण रोहणकर यांनी पार पाडली.

सायबर गुन्हेगारांमार्फत लोकांची वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवुन फसवणूक केली जाते. त्यामुळे जनतेने सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे व मोबाईल चोरी झाल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले.