जांगदा ग्रामस्थांच्या एकीतून ग्रामसभेने साकारले राज्यातील पहिले बांबू रोपवन

सीईओ आयुषी सिंग यांच्या हस्ते उद्घाटन

गडचिरोली : सामुहिक वनहक्क प्राप्त धानोरा तालुक्यातील जांगदा बु. ग्रामसभेने बांबू रोपवनाची सुरूवात केली. या ग्रामसभेने साकारलेल्या राज्यातील या पहिल्या रोपवनाचे उद्घाटन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग (आयएएस) यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व ग्रामसभांसाठी योग्य उदाहरण निर्माण करणाऱ्या जांगदा बु. या ग्रामसभेने एकूण 20 हे.आर क्षेत्रात बांबू रोपवन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

कायदा कागदावर आणायला मेहनत लागतेच, पण त्याहीपेक्षा कायदा जमिनीवर उतरवायला ताकद लागते. पण ग्रामस्थांचा एकीमुळे हे सहज शक्य करता येऊ शकते हे गडचिरोली जिल्ह्यातील जांगदा ग्रामसभेने दाखवून दिले.

दि.३० नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी यंत्रणा म्हणून ग्रामसभेला सामुहिक वनहक्क प्राप्त झाले. ग्रामसभेच्या माहितीप्रमाणे जंगलातील ५ हे.आर. क्षेत्र पुर्वीपासून ‘देवराई’ म्हणून आरक्षित आहे. जिल्हा प्रशासन आणि गोंडवाना विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरात सुरु असेलेल्या एकल ग्रामसभा सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित या ग्रामसभेला मानव विकास मिशन अंतर्गत गोडाऊन बांधकाम योजनेअंतर्गत 100 मेट्रिक टन क्षमतेचे गोडाऊन मंजूर करण्यात आले आणि ग्रामसभेने स्वतः याचे बांधकाम पूर्ण केले. त्याचेही उद्घाटन आयुषी सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना सीईओ आयुषी सिंह यांनी रोहयोअंतर्गत बांबू, फळबाग अशा निरंतर उत्पादनवाढीची आणि रोजगार देणारी कामे घेण्याची सूचना ग्रामसभेला केली. एकल सेंटरच्या नोडल अधिकारी चेतना लाटकर यांनी कुतूहलाने ग्रामसभेचे अभिनंदन करून ग्रामसभेने प्रशिक्षणाची योग्यरित्या अंमलबजावणी केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. इतर सर्व ग्रामसभांनी यातून प्रेरणा घेत या ग्रामसभेच्या पावलावर पाऊल ठेवून ३० नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्याणाच्या मदतीने अनेक विकास कामांची सुरुवात करण्याचे आवाहन केले.

सदर कार्यक्रमासाठी व ग्रामसभेला त्यासंबंधी अधिक मार्गदर्शन व मदत करण्याकरिता अतिरिक्त मुख्य कार्यकारी राजेंद्र भुयार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) साळुंखे यांनी सहकार्य केले. या सर्व कार्यक्रमासाठी तहसीलदार श्रीमती लोखंडे, बीडीओ टीचकुले, अभियंता श्रीमती मसराम, सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती जांगदा बु.चे सर्व सदस्य आणि गावातील शासकीय कर्मचारी तथा एकल सेंटर टीमने सहकार्य केले.