दारूड्या पतीचा लाकडी दांड्याने खून करणाऱ्या पत्नीसह मुलाला जन्मठेपेची शिक्षा

दोन वर्षांपूर्वीचा पावीमुरांडातील थरार

गडचिरोली : दारूड्या पतीने प्रकृती ठीक नसतानाही दारू पिऊन येऊन भांडण केल्याने पत्नी आणि मुलाने लाकडी दांड्याने बेदम मारहाण करीत त्याची किरकिर कायमची संपवली. दोन वर्षापूर्वी चामोर्शी तालुक्यातील पावीमुरांडा या गावात भर दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर आरोपी पत्नी आणि तिच्या तरुण मुलाविरूद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. मंगळवारी या प्रकरणी आरोपींना दोषी ठरवत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी मायलेकांना जन्मठेप आणि प्रत्येकी तीन हजार रुपयांच्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली.

दिलीप कुमरे असे मृत इसमाचे नाव आहे. आरोपींमध्ये पत्नी बारूबाई आणि मुलगा समीर यांचा समावेश आहे. या प्रकरणाची हकीकत अशी की, पावीमुरांडा येथे दिलीप कुमरे हा पत्नी बारूबाई आणि मुलगा समीर यांच्यासोबत राहात होता. दिलीपला दारूचे व्यसन होते. अशात त्याची प्रकृती ठीक नसल्याने 20 आॅगस्ट 2022 रोजी तो उपचारासाठी गडचिरोलीला गेला होता. तेथून परत आला तेव्हा तो दारू प्यालेला होता. याबाबत पत्नी बारूबाई हिने विचारले असता दिलीपने तिच्याशी भांडण सुरू केले. एवढेच नाही तर तिला मारहाण केली.

या प्रकारानंतर बारूबाईने बांधकामावरील मजुरीसाठी घोटजवळच्या मंजेगाव येथे गेलेल्या मुलाला मोबाईलवर झालेला प्रकार सांगितला. दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.22 ला समीर घोटवरून एसटी बसने घरी आला. यादरम्यान पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. यात आई आणि मुलाने मिळून दिलीपला लाकडी दांड्याने मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी तो लाकडी दांडा चुलीत जाळला. पण अखेर हा गुन्हा उघडकीस आणला.

या प्रकरणात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकिल एस.यु.कुंभारे यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणाचा तपास पो.निरीक्षक बिपीन शेवाळे यांनी केला.