अवैध मुरूम उत्खननप्रकरणी संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या

जनकल्याण प्रतिष्ठानची प्रशासनाला मागणी

गडचिरोली : रेल्वेमार्गाच्या भराव्याकरिता अवैध मुरूम उत्खननप्रकरणी जेपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 2 लाख 73 हजार 351 ब्रास मुरूमासाठी पाच पट म्हणजे 235 कोटी 8 लाख 18 हजार रुपये दंड आकारण्यासंदर्भात प्रशासनाने नोटीस दिली. याप्रकरणी दंड वसुल करण्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

गेल्या आठवड्यात प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी गठीत केलेल्या विशेष जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख तहसीलदार संजय पवार यांच्या निगरानीत सदर कंपनीवर ही कारवाई केली गेली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले अवैध मुरूम काढण्याचे काम उघड झाले. या पद्धतीने गडचिरोली तहसील कार्यालयाच्या क्षेत्रात नेहमीच अवैधपणे मुरूम, रेती काढणे सुरू असते, पण त्याकडे अधिकारी लक्ष देत नाहीत. याप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पद्मशाली व सचिव प्रा.अशोक लांजेवार यांनी केली आहे.