जेव्हा भर रस्त्यात बिबट्या ठाण मांडून बसतो, कार चालकाचे प्रसंगावधान

शिक्षकाने घेतलेला व्हिडिओ व्हायरल

कोरची : जंगलातील सर्वात हिंस्र प्राण्यांपैकी एक असलेला बिबट्या आपण जात असलेल्या मार्गावरच बसून असेल तर कोणीही घाबरून गेल्याशिवाय राहणार नाही. अशाच एका प्रसंगाचा सामना करण्याची वेळ कोरचीतील एका शिक्षकावर आली. प्रसंगावधान राखत कार चालकाने लगेच कार थांबवल्याने पुढील दुर्घटना टळली. काही वेळाने तो बिबट्या रस्त्याच्या बाजुला झुडूपात गेला. पण या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या मार्गाने नेहमी प्रवास करणाऱ्यांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, येथील शिक्षक सुनील नारनवरे आणि कंत्राटदार रामलाल माकडे हे दोन दिवसांपूर्वी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास कोरचीवरून कुरखेड्याकडे कारने निघाले होते. बेडगाव घाटाच्या पहिल्या उतारावरील पुलाजवळ त्यांची कार आली असताना अचानक समोर रस्त्याच्या मधोमध बिबट्या बसून असल्याचे त्यांना दिसून आले. माकडे यांनी लगेच प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. समोर बिबट्याला बघून गाडीत बसलेले शिक्षक नारनवरे आणि कंत्राटदार माकडे चांगलेच घाबरले. मात्र काही वेळातच बिबट्या रस्त्याच्या बाजूच्या झुडूपात जाऊन बसला. त्यामुळे हिंमत करत त्यांनी आपली कार हळूहळू पुढे काढली. यावेळी त्यांनी आपल्या मोबाईलने बिबट्याचा व्हिडीओ घेतला.

कुरखेडा ते कोरची या मार्गाने नियमित प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांना यापूर्वीसुद्धा या घाटावर बिबट्याचे दर्शन झाले आहे. बेडगाव घाट 9 किलोमीटरचा असून घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. घाटात 60 ते 80 फुटाची दरी आहे. घाटावरील रस्त्यावर अनेक चढाव आणि नागमोडी वळणे आहेत. त्यामुळे चारचाकी, दुचाकी वाहने हळू जातात. अशावेळी वन्यप्राण्यांचे अचानक समोर येणे वाहनधारकाच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकते.

या जंगलामध्ये सध्या जंगली हत्ती, अस्वल, रानडुक्कर, बिबट, नीलगाय अशा वन्य प्राण्यांचा वावर आहे. बेडगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांनीही बेडगाव घाटावर बिबट्याचे वास्तव्य असल्याची पुष्टी करत नागरिकांनी या मार्गाने एकटे प्रवास करू नये अशी सूचना केली आहे. तसेच शेतीच्या कामाने किंवा रानभाज्यांसाठी जंगल परिसरात जायचे असल्यास समूहाने जावे, विनाकामाने फिरू नये, असे आवाहन त्यांनी नागरिकांना व शेतकऱ्यांना केले आहे.