श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली राजनगरी, एलईडी स्क्रिनवर अयोध्येतील थेट दर्शन

अम्ब्रिशराव आत्राम यांची विशेष उपस्थिती

अहेरी : येथील वृंदावनधाम येथे २२ जानेवारीला श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नागरिकांना पाहता यावे यासाठी भव्य एलईडी स्क्रिन आणि मंडपाची व्यवस्था माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या वतीने करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहप्रचारक सागर अहेर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

तत्पूर्वी अहेरी शहरात सकाळी ९ वाजतापासून मुख्य मार्गावरून मंगल कलशयात्रा काढण्यात आली. यात विविध समाजातील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विठ्ठल-रखुमाई मंदिरापासून कलश यात्रेला सुरुवात झाली. शहरात फिरून वृंदावनधाम येथे कलश यात्रा पोहोचली.

वृंदावन धाम येथे अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावर अंब्रिशराव आत्राम यांनी भक्तीभावाने महाआरती केली. यावेळी राम भक्तांनी एकच जल्लोष केला. सुमारे ५०० वर्षांनंतर प्रभू रामलल्ला सोमवारी अभिजित मुहूर्तावर भव्य दिव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या उत्सवाचे थेट प्रक्षेपण मोठ्या एलईडी पाहण्याचा आनंद सर्व नागरिकांनी घेतला. श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील भव्य नवनिर्माण मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा क्षण सर्वांनाच भावुक करणारा आहे. या दैवी कार्यक्रमाचा एक भाग होणे हे माझे भाग्य आहे, अशी भावना यावेळी अंब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केली.

संध्याकाळी जागोजागी दीपोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण शहरात राममय वातावरण दिसत होते. ठीकठिकाणी कलश यात्रेदरम्यान पाणी, ज्युस, फळे आदी वाटण्यात आले.