आलापल्ली : बालगोपालांमधील क्रीडा कौशल्य व कलागुणांना वाव मिळावा यासाठी केंद्र, तालुका व जिल्हास्तरावर दरवर्षी क्रीडा व सांस्कृतिक संमेलनांचे आयोजन केले जाते. मात्र मागील अनेक वर्षांपासून या निधीत वाढ न झाल्याने अत्यंल्प निधीतून आयोजन करावे लागत आहे. मोठा निधी उपलब्ध झाल्याशिवाय अशा कार्यक्रमांचे आयोजन करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे केंद्र, तालुका आणि जिल्हास्तरावरील क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आवश्यक असलेला निधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.
अहेरी तालुक्यातील तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक संमेलनाचे उद्घाटन सोमवारी (दि.२२) आलापल्ली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात त्यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. सहउद्घाटक म्हणून माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम, प्रमुख पाहुणे म्हणून माजी पं.स. सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे, विशेष अतिथी म्हणून अहेरीचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे, प्राचार्य गजानन लोनबले, आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार, राजारामच्या सरपंच निर्मला आत्राम, तसेच श्रीकांत मद्दीवार, अरुण मुक्कावार, लक्ष्मण येर्रावार, पुष्पा अलोने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना.आत्राम म्हणाले, आदीवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्तगुण दडलेले असून ते बाहेर काढण्यासाठी क्रीडा क्षेत्रात मोठी जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. आपल्या भागात चांगल्या सुसज्ज स्टेडियमची गरज आहे. त्या अनुषंगाने अहेरी येथे २५ कोटी रुपयांच्या निधीतून स्टेडियम उभारणार आहे. त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हेतर तर गोंडवाना विद्यापीठासाठी देखील एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी, तरुण आणि तरुणींनी खेळामध्ये सातत्य ठेवल्यास भविष्यात क्रीडा क्षेत्रात मोठे यश मिळण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे यांनी चार वर्षानंतर यावर्षी शालेय क्रीडा स्पर्धा झाल्याचे सांगितले. शालेय विद्यार्थ्यांनी लेझिमद्वारे मान्यवरांचे जल्लोषात स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन रामदास कोंडागुर्ले व शिक्षिका सुमन चव्हाण यांनी केले.
५०० विद्यार्थी दाखवणार क्रीडा कौशल्य
या क्रीडा संमेलनात अहेरी तालुक्यातील अहेरी, आलापल्ली, वेलगुर, देवलमरी, पेरमिली, राजाराम, महागाव, बोरी, दामरंचा, जिमलगट्टा, उमानूर, देचली असे १२ केंद्र असून त्याअंतर्गत येणाऱ्या शाळांमधील तब्बल ५०० विद्यार्थी खेळाडू आपले क्रीडा कौशल्य व कलागुण दाखविणार आहेत.