गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील लोहखाणीत ६ ऑगस्टच्या संध्याकाळी घडलेल्या अपघातात तीन अभियंत्यांना जीव गमवावा लागला. यातील एक अभियंता नागेपल्ली येथील तर उर्वरित दोन अभियंते झारखंड आणि ओडिशा राज्यातील होते. इतर तीन जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. लॅायड्स मेटल्सचे संचालक बी.प्रभाकरन यांनी या घटनेतील मृत अभियंत्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आम्ही खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे असल्याचे सांगत त्यांना दिलासा दिला.
या घटनेतील मृतांमध्ये उपअभियंता ओम प्रकाश (रा.झारखंड), विद्युत विभागाचे सहाय्यक अभियंता नृसिंह राणा (रा.ओडिशा) आणि मेकॅनिकल विभागाचे सहायक अभियंता सोनल खुशाबराव रामगिरवार (रा.आलापल्ली) या तिघांचा समावेश आहे. तसेच कन्नीलाल बगर तिग्गा (रा.हेडरी), परमेश्वर बेरा आणि नाबो कुमार बेरा (रा.झारखंड) या जखमींवर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर कंपनीचे संचालक बी.प्रभाकरन यांनी वैयक्तिकरित्या मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आपल्या कर्मचार्यांच्या जीवित हाणीमुळे व्यवस्थापनाला दु:ख झाले आहे, या दुःखाच्या क्षणी मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे सांगत त्यांनी त्यांचे सांत्वन केले.
असा घडला पहाडावरचा हा अपघात
सुरजागड आयर्न ओर माईन्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे कार्यकारी संचालक एस.व्यंकटेश्वरन यांनी हा अपघात नेमका कसा झाला हे स्पष्ट केले. दि.6 रोजी सायंकाळी 5.45 च्या सुमारास वर्कशॉपपासून सुमारे 600 मीटर अंतरावर तीन अभियंते आणि दोन कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे एक बोलेरो कॅम्पर (क्रमांक MH 33, T3054) वाहन वरून येणाऱ्या व्हॅाल्वो ट्रकला जागा देण्यासाठी उभे होते. पावसामुळे खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी त्या व्हॅाल्वो ट्रकमधून काही सामान उतरविले जात होते. दरम्यान त्याचवेळी दरवाजा क्रमांक 140 मधून लोहदगड भरलेला एक व्हॅाल्वो ट्रक खाली येत होते. त्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि डाव्या बाजुचे पुढचे चाक फिरले, त्यामुळे तोल जाऊन तो ट्रक खालच्या बाजुने उभ्या असलेल्या बोलेरो कॅम्परवर कोसळला. हा अपघात पाहताच घटनास्थळापासून काही अंतरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने वॉकीटॉकीवरून घटनेची माहिती कार्यालयात दिली. तातडीने बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि वाहनाखाली दबलेल्या सदस्यांना त्यांनी बाहेर काढून हेडरीच्या रुग्णालयात पाठवले. तेथून त्यांना अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पण तीन अभियंत्यांचा तिथे मृत्यू झाला. बोलेरोमधील उर्वरित दोन कर्मचारी आणि व्हॅाल्वो ट्रकच्या चालकावर उपचार सुरू आहेत.