गोंडवाना विद्यापीठाला मिळाले लोकपाल, अविनाश राजकारणे यांची नियुक्ती

सेवानिवृत्त अतिरिक्त सत्र न्यायाधिशांना संधी

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे पहिले लोकपाल म्हणून नागपूर येथील सेवानिवृत्त अतिरिक्त सत्र न्यायाधीश अविनाश मधुकर राजकारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसूचनेनुसार लोकपाल पदावर अंशकालीन तत्वावर , तीन वर्षाकरीता किंवा त्यांच्या वयाची ७० वर्ष पूर्ण होईल तोपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत त्यांची नियुक्ती राहणार आहे.

विद्यापीठाशी संलग्नित चंद्रपूर, गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांतील महाविद्यालये व विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाच्या निर्णयाविरुद्धच्या अपिलांवर लोकपाल राजकारणे हे सुनावणी करून निर्णय देतील.