फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, आ.वंजारी यांचा विश्वास

चामोर्शीत तालुका काँग्रेसचा बुथ मेळावा

गडचिरोली : ईडी-सीबीआय यासारख्या स्वायत्त संस्थांना हाताशी धरून फोडाफोडीचे राजकारण करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सर्वसामान्य जनताच धडा शिकवणार आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकसंघ होऊन बुथचे सूक्ष्म नियोजन करावे आणि आपला बुथ मजबुत करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना आमदार अभिजीत वंजारी यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.

चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटीद्वारा आयोजित बुथ पदाधिकारी प्रशिक्षण मेळाव्यात ते बोलत होते. लोकशाही मुल्ये संपविण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे. आगामी काळात देशातील लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीला पूर्ण ताकतीने सामोरे जाऊन काँग्रेस पक्षाची सत्ता आणावी लागेल, असे मत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, माजी आ.आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ.चंदा कोडवते, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे, तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.