गडचिरोली : महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले व फातिमा शेख यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारं उघडी केल्यानंतर स्त्रीमुक्तीची पहाट उगवली. थोर महापुरुषांचे विचार व कार्य आजच्या आधुनिक समाजासाठी स्फूर्तिदायक आहेत. परंतु अशा थोर महापुरुषांना आपण जातीपातीच्या आधारावर वाटून घेणे म्हणजे त्यांची थोरवी कमी करण्यासारखे आहे, अशी खंत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी व्यक्त केली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माळी समाज संघटना कासवीच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभात आ.गजबे बोलत होते. सर्व थोर महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी सर्व समाजाने एकत्र येऊन साजरी करण्याचा आदर्श आपण उगवत्या पिढीपुढे ठेवला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कासवीवासियांकडून हा आदर्श जोपासला जातो, याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक होते. याप्रसंगी वक्ते जयकुमार मेश्राम, मुख्याध्यापक यशवंत जांभुळकर, माजी जि.प.सदस्य मनीषा दोनाडकर, मिलिंद खोब्रागडे, सुनिता तागवान, सभापती परसराम टिकले, तसेच सरपंच सतीश गुरनुले, उपसरपंच प्रवीण ठेंगरी, पोलीस पाटील बाळकृष्ण सडमाके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वामन मरसकोल्हे, रामदास मसराम, अनुसया दोनाडकर , दौलत धोटे, चंद्रकांत दोनाडकर, प्रवीण रहाटे, गुरुदास बोरुले, सुधाकर निकेसर, सचदेव मोहुर्ले, मुख्याध्यापक प्रभू वैद्य, अन्वर शेख, गुरुदास लोणारे, साधना कोटरंगे, आसाराम प्रधान, उद्धव दिघोरे, रजिंत बनकर, विजय पत्रे, मुख्याध्यापक सुरेश वाटगुरे असे अनेक जण उपस्थित होते.
यावेळी मुर्तिकार रमेश आणि मंदाताई या लाकडे दाम्पत्याचा शाल, श्रीफळ आणि साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक धोटे, रसंचालन चंद्रशेखर प्रधान यांनी तर आभार सहदेव गुरनुले यांनी मानले.