अहेरी : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अहेरी येथे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी महायज्ञ आणि अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती फुलांनी सजवून अहेरी नगरीतून रॅली काढण्यात आली. यानंतर ५१ जोडप्यांच्या हस्ते महायज्ञ करण्यात आला.
सोमवारी अयोध्या नगरीत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या अहेरी राजनगरीत २१ जानेवारी रोजी स्व.विश्वेश्वरराव महाराज चौकात महायज्ञ आणि अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी धर्मरावबाबा आणि भाग्यश्रीताई यांनी श्रीरामाचे विधीवत पूजन करून महायज्ञ कार्यक्रमात सहभाग घेतला.
तत्पूर्वी प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती सजवून पूजापाठ करत अहेरी नगरीतून रॅली काढण्यात आली. अहेरी नगरीला अयोध्यासारखे सजविण्यात आल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण तयार झाले आहे.
हवन पुजेला ५१ जोडप्यांची उपस्थिती
महायज्ञ कार्यक्रमात हवन पूजा करण्यात आली. यात अहेरी येथील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी अशी ५१ जोडपी सहभागी झाली होती. सर्वांनी मंत्राचा जप करून अग्नित आहुती अर्पण केली. महायज्ञ पुजेनंतर भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते महाप्रसाद वितरण करण्यात आला. मोठ्या संख्येने भाविकांनी याचा सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.